…म्हणून तूर्तास महिलांना लोकलनं प्रवास करता येणार नाही

रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून, त्यावर रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकार विचारविनिमय करणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:05 PM, 16 Oct 2020

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकार सर्व महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देणार असल्याचं एक परिपत्रक जारी करण्यात आलं होतं. पण रेल्वे बोर्डानं असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तूर्तास तरी महिलांना उद्यापासून रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. रेल्वे प्रशासनाकडे राज्य सरकारनं प्रस्ताव पाठवला असून, त्यावर रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकार विचारविनिमय करणार आहे. त्यानंतरच महिलांसाठी रेल्वे प्रवासाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. (women will not be able to travel by train)

अद्यापही अधिकृतरीत्या रेल्वेमध्ये महिलांना प्रवास करता येईल का, याबाबत ठोसपणे सांगता येत नाहीये. त्यामुळे महिलांना 17 तारखेपासून लोकलने प्रवास करता येईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तत्पूर्वी राज्य सरकारकडून महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्धीस दिलं होतं. महिलांना मुंबई लोकलमध्ये सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत तर संध्याकाळी 7 नंतर पुढे प्रवास करता येणार असून, महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी क्यूआर कोडची आवश्यकता नसल्याचंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं.

कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे 22 मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉक झाले, तेव्हापासून अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने, सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेकांनी मुंबई लोकल रेल्वे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं वकिलांना ट्रेननं प्रवास करण्याची मुभा दिली होती.

अनलॉकची प्रक्रिया केल्यानंतर अनेक गोष्टी सुरू केल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरु करण्यात आले. आजपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरु करण्यात आले. हळूहळू सर्व गोष्टी सुरू केल्या जात आहेत. आता सिनेमागृहदेखील सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरू करण्यात आलेली नाही.


संबंधित महत्त्वाच्या बातम्या

महिलांना उद्यापासून मुंबई लोकलने प्रवास करण्याची मुभा, वेळेची मात्र मर्यादा

Mumbai Local | सात महिन्यांनी लेडीज डब्यात गजबज, घटस्थापनेला महिलांसाठी लोकलचे दार उघडणार