अन्नातून विषबाधेमुळे भारतात दरवर्षी 15 लाख लोकांचा मृत्यू

दुषित अन्नामुळे 200 प्रकारचे आजार होऊ शकतात. यात अतिसार, कॅन्सर यांसारख्या घातक आजारांचाही समावेश आहे. आतापर्यंत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 1 लाख 25 हजार मुलांचा अन्नातील विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे

अन्नातून विषबाधेमुळे भारतात दरवर्षी 15 लाख लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : आपण सर्वजण बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरील स्टॉलवरचे चटपटीत पदार्थ खातो. काही वेळा हे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्या पोटात दुखू लागते. त्यावर उपचार घेण्यासाठी आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्याला अन्नातून विषबाधा झाल्यांच लक्षात येतं. दरम्यान दरवर्षी भारतात अन्नातून विषबाधा झाल्याने 15 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती एका अहवालात उघड झाली आहे. दी लान्सेट (The Lancet) या मेडिकल एजन्सीने याबाबतचा अहवाल सादर केला आहे.

दी लान्सेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्ल्याने भारतात दरवर्षी तब्बल 15 लाख 73 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसंच अन्नातून विषबाधेमुळे मृत झालेल्या आकडेवारीनुसार भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर चीन हे पहिल्या क्रमांकावर असून चीनमध्ये दरवर्षी 31 लाख 28 हजार लोकांचा अन्नातून विषबाधा झाल्यानं मृत्यू होतो.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या Integrated disease surveillance program (IDSP) या अंतर्गत माहितीनुसार, 2008 ते 2017 या कालावधीत अन्नातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या कालावधीत 2 हजार 867 लोकांना दुषित अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. तर 4 हजार 361 जणांना अतिसाराची लागणी झाली आहे. यंदा 2019 या वर्षात 6 ते 12 मे दरम्यान 14 लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची नोंद करण्यात आली.

वर्ल्ड बँकेने दिलेल्या एका रिपोर्टनुसार भारतात दुषित अन्न खाल्ल्याने होणारे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे भारतावर तब्बल 1 कोटी 78 लाख 100 रुपयांचा आर्थिक बोजा पडतो. हा आर्थिक बोजा देशातील जीडीपीच्या तुलनेत 0.5 टक्के आहे.

2008 पासून 2017 पर्यंत अन्नातून विषबाधा झालेल्या लोकांची आकडेवारी

2008 – 50

2009 – 120

2010 – 184

2011 – 305

2012 – 255

2013 – 370

2014 – 306

2015 – 328

2016 – 395

2017 – 242

अन्नपदार्थात भेसळ होण्याचं प्रमाणात वाढ 

लग्न, पुजा, हॉस्टेल, कॅटीन यांसारख्या ठिकाणी अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण जास्त असते. देशात गेल्या तीन वर्षात भेसळयुक्त अन्नपदार्थांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2015 पासून 2016 या वर्षात देशात भेसळयुक्त अन्नपदार्थाची चाचणी करण्यासाठी 72 हजार 499 नमुने घेतले. त्यात 16 हजार 133 म्हणजेच 22 टक्के नमुन्यात भेसळ आढळली.

2016 ते 2017 या कालावधीत 78 हजार 340 नमुने घेतले होते. त्यानंतर 18 हजार 325 (23 टक्के) नमुन्यांमध्ये भेसळ आढळली.

2017 ते 2018 या कालावधीत देशातून 99 हजार 353 नमुने तपासण्यात आलेत. त्यातील 24 हजार 262 (24 टक्के) नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं स्पष्ट झालं.

‘या’ देशात सर्वात जास्त भेसळ 

  • मिझारोम : 84 नमुन्यांमधील 52 नमुन्यात (62 टक्के) भेसळ
  • राजस्थान :  3549  नमुन्यांमध्ये 1598 (45%) नमुन्यात भेसळ
  • उत्तर प्रदेश : 19063 नमुन्यांपैकी 8375 (44%) नमुन्यात भेसळ
  • झारखंड : 580 नमुन्यांची तपासणी 219 (38%) नमुन्यात भेसळ
  • मणिपुर : 830 नमुन्यांमधील 295 (36%) नमुन्यात भेसळ

1 लाख 25 हजार लहान मुलांचा मृत्यू

दुषित अन्नामुळे 200 प्रकारचे आजार होऊ शकतात. यात अतिसार, कॅन्सर यांसारख्या घातक आजारांचाही समावेश आहे. दरवर्षी जगभरात 60 कोटी लोक भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने आजारी पडतात. तसेच आतापर्यंत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या 1 लाख 25 हजार मुलांचा अन्नातून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *