रिअल इस्टेट क्षेत्रासाठी 2021 वर्ष ठरणार लाभदायी; 7 मोठे बदल

या क्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची लक्षणं दिसत आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:26 PM, 12 Jan 2021
15 story building permission pass by Aurangabad mahanagarpalika

नवी दिल्लीः रिअल इस्टेट क्षेत्र हे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचे मानले जातेय. गेल्या 8 ते 10 वर्षांपासून या क्षेत्रावर मंदीचे संकट होते. यातच कोविड 19 चे संकट अचानक जगावर ओढवल्यानं संपूर्ण जगच थांबले. याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम झाला. त्यातच रिअल इस्टेट संपूर्ण कोलमडून गेले. देशव्यापी लॉकडाऊन, व्यवसाय बंद पडणे आणि नोकर्‍या गमावणे यामुळे मालमत्ता विक्री थांबली. याखेरीज पैशांची आणि कामगारांची कमतरता, रखडलेले बांधकाम यामुळे रिअल इस्टेटची अवस्थाही बिकट झाली. परंतु वर्ष 2021 मात्र रिअल इस्टेट क्षेत्रासाठी स्थिरता आणेल, असे दिसत आहे. या क्षेत्रात सकारात्मक बदल होण्याची लक्षणं दिसत आहेत. (2021 Will Be a Profitable Year For The Real Estate Sector; 7 Major Changes)

1. मालमत्तांना मोठ्या प्रमाणात मागणी

रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करून 4% केलेत, ज्यामुळे गृह खरेदीदारांसाठी कर्ज स्वस्त झाले. परिणामी गृह कर्जाचे व्याजदर कमी होऊन 6.95% झाले. खरेदीदारास मालमत्ता गुंतवणुकीसाठी हे बूस्टर म्हणून कार्य करेल. खरेदीदारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि खरेदीची एकूण किंमत कमी करण्याच्या हेतूने काही राज्यांनी देखील मुद्रांक शुल्कात कपात करण्याची घोषणा केली. उदाहरणार्थ, महाराष्ट्राने सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दरांमध्ये तात्पुरती कपात करण्याची घोषणा केली. भारतातील सर्वात महागड्या बाजारपेठेचे घर असलेल्या या राज्यातील खरेदीदार सध्या मालमत्तेच्या किमतीच्या 2% रक्कम मुद्रांक शुल्क म्हणून भरून मालमत्ता नोंदणी करू शकतात. शिवाय इतर देशांतून एनआरआय भारतात परत येणे, चीनमधून भारतात येणाऱ्या कंपन्या यामुळे मालमत्तांची मागणी वाढवून रिअल इस्टेट मार्केटमध्ये मोठी संधी निर्माण होईल.

2. स्थावर मालमत्ता गुंतवणुकीत वाढ

2020 या कठीण काळात मोठ्या गुंतवणूकदारांना असे आढळले की, रिअल इस्टेट गुंतवणूक ही दीर्घ काळासाठी सर्वात चांगली आहे. वारंवार होणाऱ्या शेअर बाजाराच्या क्रॅशमुळेसुद्धा प्रत्येकाची मानसिकता बदललीय. चांगली बातमी म्हणजे वर्ष 2021 मध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या असंख्य संधी असतील. स्वतः च्या बजेट आणि एकंदर गुंतवणुकीच्या योजनेनुसार गुंतवणूकदार कमी किमतीच्या स्टुडिओ अपार्टमेंट्सपासून ते लक्झरी बंगले आणि पेंटहाऊसपर्यंत वेगवेगळ्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकतील.

3. उदयोन्मुख मायक्रो-मार्केटमध्ये वाढ

2021 मध्ये अनेक ब आणि क श्रेणीतील शहरे रिअल इस्टेटच्या गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतील. कोविड 19 नंतर मुख्यतः लहान शहरांमध्ये होणारे स्थलांतर आणि सहज पडवरणारी घरे यामुळे अशा शहरांमध्ये निवासी घरांना मोठी मागणी असेल. या शहरांत पायाभूत सुविधांमध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठा विकास होईल.

4. व्यावसायिक मालमत्तेत वाढती मागणी

2021 मध्ये व्यावसायिक रिअल इस्टेट मालमत्तेच्या मागणीत निरंतर वाढ होण्याची अपेक्षा आहे. ऑफिस स्पेस, आयटी पार्क, डेटा सेंटर, वेअर हाऊसिंग आणि लॉजिस्टिक पार्कमध्ये गुंतवणूक वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आगमन, स्टार्ट-अप्स आणि को-वर्किंग स्पेस इत्यादींच्या उदयामुळे यात वाढ झाली असून, ही मागणी वाढत जाईल.

5. ‘गेटेड कम्युनिटी’ मध्ये घरे घेण्यास प्राधान्य

संभाव्य गृह खरेदीदार येत्या वर्षात स्वावलंबी असलेल्या ‘गेटेड कम्युनिटी’ मध्ये राहण्यास प्राधान्य देतील. अशा कम्युनिटीमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण केल्या जातात. शिवाय या स्वयंपूर्ण सोसायटी विविध सुविधा, सुरक्षित वातावरण प्रदान करतात, ज्यामुळे सोसायटीच्या बाहेर जायची गरज जास्त पडत नाही.

6. नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब

सध्या आपण सोशल डिस्टन्सिंग, शारीरिकरित्या विविध जागेवर जाण्यास निर्बंध, तसेच कोविड 19 च्या आजारामुळे उद्भवलेल्या इतरही बऱ्याच गोष्टींवर घालण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करत आहोत. अशा परिस्थितीत रिअल इस्टेटकडे नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करणे हाच एक उपाय शिल्लक आहे. यामुळे कुठेही न जाता घरच्या घरीच राहून आपले बरेच काम होईल. या टेक्नॉलॉजीमुळे विक्रेते आणि खरेदीदार दोघाच्या वेळ, पैसे आणि ऊर्जेची बचत होईल.

7. प्रॉपटेक प्लॅटफॉर्मचा वापर

रिअल इस्टेटमध्ये असलेल्या अनिश्चित परिस्थितीत स्थिरता आणण्यासाठी प्रोपटेक हा एक उत्तम मार्ग आहे. प्रॉपटेक इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून मालमत्ता मालक, खरेदीदार आणि मालमत्ता व्यवस्थापक यांना त्यांची मालमत्ता व्यवस्थापित करण्यासाठी मदत करते. प्रॉपटेकचा उद्देश प्रॉपर्टी विकणे, विकत घेणे, भाड्याने देणे इत्यादी गोष्टी सुलभ आणि कार्यक्षम बनविणे आहे. एकूणच रिझर्व्ह बँक आणि शासनाची नवीन धोरणे, टेक्नॉलॉजी आणि प्रॉपटेकचा योग्य अवलंब यांच्या साहाय्याने रिअल इस्टेट पुन्हा लवकरच बाहेर येऊन स्थिर होईल.

(लेखिका स्वप्ना मोरे रिएल्टर आणि उद्योजक आहेत.
)

संबंधित बातम्या

घरं घेण्यासाठी मुंबईकरांची ना ठाणे, ना नवी मुंबईला पसंती! वाचा कुठे खरेदी करतायत मुंबईकर घर खरेदी?

मुंबई रियल इस्टेट क्षेत्रात इतिहास घडला, 10 दिवसांत 3 हजार 95 घरांची विक्री!

2021 Will Be a Profitable Year For The Real Estate Sector; 7 Major Changes