57 वर्षांच्या संसारानंतर मातृत्वसुख, 74 व्या वर्षी जुळ्या मुलींना जन्म देत विश्वविक्रम

आंध्र प्रदेशात राहणाऱ्या मंगयाम्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जुळ्या मुलींना जन्म दिल्या. पहिल्यांदा बाळाला जन्म देणारी सर्वात वृद्ध महिला ठरण्याचा विश्वविक्रम त्यांनी नोंदवला आहे

57 वर्षांच्या संसारानंतर मातृत्वसुख, 74 व्या वर्षी जुळ्या मुलींना जन्म देत विश्वविक्रम

हैदराबाद : मातृत्वसुख अनुभवणं हे एखाद्या महिलेसाठी किती आनंददायी असतं, याचं वर्णन शब्दात करणं अवघडच नाही, तर निव्वळ अशक्य आहे. स्वतःचं अपत्य असावं, यासाठी आस लावून बसलेल्या 74 वर्षांच्या माऊलीची हाक अखेर निसर्गाने ऐकलीच. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) राहणाऱ्या मंगयाम्मा (Mangayamma) यांना 54 वर्षांच्या संसारानंतर स्वतःचं लेकरु हातात खेळवण्याचं सुख लाभलं.

‘आंधळा मागतो एक, देव देतो दोन’ या उक्तीचा प्रत्यय शब्दशः कोणी घेतला असेल, तर त्या आहेत मंगयाम्मा. कारण एका तरी बाळाने आपल्या पोटी जन्म घ्यावा, अशी इच्छा असलेल्या मंगयाम्मा यांना जुळ्या मुली झाल्या. आई होण्याचा अनुभव घेतानाच नकळत मंगयाम्मा यांनी विश्वविक्रमही रचला आहे.

मंगयाम्मा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात असलेल्या नेलापार्टीपाडू गावात राहत होत्या. 22 मार्च 1962 रोजी त्यांचं लग्न येरामत्ती सीताराम राजाराव यांच्याशी झालं. लग्नाच्या काही महिन्यांतच नातेवाईक ‘पाळणा कधी हलणार?’ हा प्रश्न विचारायला लागले. सुरुवातीला गमतीत विचारला जाणारा प्रश्न गंभीर व्हायला लागला. मंगयाम्मा आणि येरामत्ती यांनाही आता बाळाची ओढ लागली होती. मात्र कित्येक प्रयत्न करुनही अपत्यप्राप्ती होत नव्हती.

लग्नाला जसजशी वर्ष उलटू लागली, तसतशी राव दाम्पत्याची चिंता वाढायला लागली. अखेर, आपणही स्वतःचं मूल खेळवू शकतो, ही आशा धूसर होत गेली. राव दाम्पत्याने आपलं मन इतर गोष्टींमध्ये रमवलं, मात्र मनात कुठेतरी ही खंत होतीच.

काहीच महिन्यांपूर्वी मंगयाम्मा यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण डोकावला. शेजारी राहणाऱ्या 55 वर्षांच्या महिलेने आयवीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधारणा केली. वय उलटून गेलेल्या महिलेला अपत्यप्राप्ती होत असल्याचं पाहून मंगयाम्मा यांची इच्छा बळावली.

गुंटूर शहरात असलेल्या ‘अहल्या नर्सिंग होम’शी त्यांनी संपर्क साधला. आयवीएफ एक्स्पर्ट डॉ. सानक्कायला उमाशंकर यांच्याशी मंगयाम्मा यांची भेट घडली. डॉक्टरांच्या भेटीत त्यांच्या सर्व शंकाचं निरसन झालं. राव दाम्पत्य हसतमुखाने केबिनमधून बाहेर पडलं.

आता वेळ होती प्रत्यक्ष गर्भधारणेची. येरावत्ती राव यांचे स्पर्म घेऊन डॉक्टरांनी आयवीएफ पद्धतीचा अवलंब केला. डॉक्टरांचे प्रयत्न आणि राव दाम्पत्याच्या प्रार्थनेला यश आलं. मंगयाम्मा यांना दिवस गेले. राव दाम्पत्याच्या आनंदाला पारावार उरला नाही.

गर्भधारणा झाल्यापासून प्रसुती होईपर्यंत मंगयाम्मा डॉक्टरांच्या निगराणीखाली होत्या. दहा डॉक्टरांचं पथक सतत नऊ महिने त्यांची देखरेख करत होतं. गुरुवारी मंगयाम्मा यांचं सिझेरियन झालं. त्यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. बाळ आणि बाळंतीण सुखरुप आहेत. बाळांचे वडील येरामत्ती राजारावही आता 80 वर्षांचे आहेत.

वयाच्या 74 व्या वर्षी पहिल्यांदाच जुळ्या मुलींना जन्म देणं, हा विश्वविक्रम असल्याची माहिती डॉ. सानक्कायला उमाशंकर यांनी दिली. हा वैद्यकीय चमत्कार असल्याचंही ते म्हणतात.

याआधी, 2016 मध्ये राजस्थानमध्ये राहणाऱ्या दलजिंदर कौर यांनी 72 व्या वर्षी मुलाला जन्म दिला होता. पहिल्यांदा आई होणाऱ्या सर्वात वृद्ध व्यक्ती ठरण्याचा विक्रम त्यांच्या नावे होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *