तुकडे-तुकडे गँगने दिल्लीची शांतता बिघडवली, जनतेने त्यांना धडा शिकवावा : गृहमंत्री अमित शाह

गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे (Amit Shah on Protesters against CAA NRC).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:47 PM, 26 Dec 2019
तुकडे-तुकडे गँगने दिल्लीची शांतता बिघडवली, जनतेने त्यांना धडा शिकवावा : गृहमंत्री अमित शाह

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (26 डिसेंबर) नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे (Amit Shah on Protesters against CAA NRC). विरोधी पक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी दिल्लीच्या जनतेची दिशाभूल केली आणि दिल्लीची शांतता भंग केली, असा आरोप अमित शाह यांनी केला. ते दिल्लीतील कडकडडूमा येथील डीडीए पूर्व दिल्ली हबचं उद्घाटन करताना बोलत होते (Amit Shah on Protesters against CAA NRC).

अमित शाह यांनी काँग्रेसला लक्ष्य करत म्हटले, “काँग्रेसच्या नेतृत्वात तुकडे-तुकडे गँग आहे. तेच दिल्लीतील अशांततेला जबाबदार आहेत. त्यांना दिल्लीच्या जनतेने धडा शिकवावा.” शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “मी तुम्हाला आज सर्वात मोठी अडचण काय आहे हे सांगू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगाने काम करत आहेत. मात्र, यात केजरीवाल सरकार सर्वात मोठी अडचण आहे. केजरीवाल सरकार विकासाच्या प्रत्येक कामात आडकाठी घालत आहेत.”

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल नव्या नव्या गोष्टी करतात. त्यांनी एक नवी सुरुवात केली आहे. विचार का करायचा? आर्थिक तरतुद का करायची? भूमिपूजनही का करायचं? उद्घाटनही का करायचं? इतर कुणी काही केलं असेल तर फक्त त्यावर आपल्या नावाचा शिक्का मारायचा, असा आरोप अमित शाह यांनी केला.

दिल्लीमधील स्वच्छ पाण्याच्या प्रश्नावर बोलताना अमित शाह म्हणाले, “देशातील प्रत्येक घरात नळाने पिण्याचं पाणी पोहचवायचं काम भाजप सरकार करणार आहे. केजरीवाल जाहिराती देऊन या योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदींनी देशातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचं आश्वसन दिलं आहे. त्यात दिल्ली देखील येते.”

केजरीवाल मुख्यमंत्री होऊन जवळपास 60 महिने होत आले आहेत तरिही त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाही. आता तर ही आश्वासनं पूर्ण होणारच नसून ते केवळ जाहिराती करुन लोकांना फसवत आहेत. यांनी आपल्या आयुष्यात केवळ विरोध करण्याचं आणि धरण्यावर बसण्याचं काम केलं आहे, अशीही टीका शाह यांनी केजरीवाल यांच्यावर केली.