भारतात थैमान घालणारा कोरोनाचा म्युटंट नेमका कसा दिसतो, वाचा सविस्तर माहिती

त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक लोक संसर्गाला बळी पडत असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. | b117 coronavirus mutation

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:45 AM, 5 May 2021
भारतात थैमान घालणारा कोरोनाचा म्युटंट नेमका कसा दिसतो, वाचा सविस्तर माहिती

नवी दिल्ली: भारत, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या B.1.1.7 या विषाणूची रचना कशी असते, याची छायाचित्रे शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केली आहेत. हा विषाणू त्याच्या काटेरी प्रोटीनच्या साहाय्याने आपल्या पेशींना चिकटतो. कोरोनाच्या (Coronavirus) या स्ट्रेनने जगभरात धुमाकुळ घातला आहे. (First Molecular image of b117 coronavirus mutation variant)

जागितक आरोग्य संघटनेने गेल्यावर्षी B.1.1.7 या विषाणूसंदर्भात धोक्याचा इशारा दिला होता. अनेक कोरोनाच्या मूळ विषाणूत अनेक म्युटेशन (बदल) होऊन B.1.1.7 तयार झाला आहे. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक लोक संसर्गाला बळी पडत असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले की, B.1.1.7 विषाणूची रचना पाहिल्यानंतर तो इतका संसर्ग कसा पसरवू शकतो, याचा अंदाज येतो. ब्रिटन आणि भारतात थैमान घातल्यानंतर आता B.1.1.7 विषाणूने आपला मोर्चा कॅनडाकडे वळवला आहे.

कोरोनाचा नवा विषाणून इतका घातक का?

या कोरोना विषाणूत N501Y हे नव्या प्रकारचे म्युटेशन दिसून येत आहे. मुख्यत: काटेरी प्रोटिनच्या थरात हे बदल दिसून आले आहेत. हेच काटेरी प्रोटिन मानवी शरीरातील ACE2 रिसेप्टरशी स्वत:ला जोडून घेतात. आपल्या शरीरातील पेशींवर असणाऱ्या पातळ थराला ACE2 असे म्हणतात. याच वाटेने B.1.1.7 हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो.


त्यामुळे B.1.1.7 हा विषाणू मानवी पेशींमध्ये शिरून झपाट्याने शरीराला संक्रमित करतो, अशी माहिती कोलंबिया विद्यापाठातील शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख डॉ. श्रीराम सुब्रमण्यम यांनी दिली.

कोरोनाचे विषाणू हे अत्यंत सूक्ष्म असतात. साध्या मायक्रोस्कोपनेही हे विषाणू दिसत नाहीत. त्यासाठी क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतो. या मायक्रोस्कोपमध्ये कोरोना विषाणूची तपासणी करताना द्रव नायट्रोजनचा वापर करुन तापमान कमी ठेवले जाते. त्यानंतर क्रायो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून इलेक्ट्रॉन्सची किरणे सोडली जातात. ही किरणे कोणत्याही सूक्ष्म विषाणूची छबी टिपू शकतात.

‘लस घेतल्यानंतर B.1.1.7 विषाणूचा धोका नाही’

डॉ. श्रीराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, N501Y म्युटेशनचा विषाणू मानवी शरीरात वेगाने प्रवेश करतो. मात्र, मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीज किंवा लस या विषाणूला निष्क्रिय करु शकते. भारतात सध्याच्या घडीला कोरोना विषाणूचे B.1.617 हे म्युटेशन पाहायला मिळत आहे. लवकरच शास्त्रज्ञ याची छायाचित्रे प्रसिद्ध करतील. जेणेकरून या विषाणूवर संशोधन करणे आणखी सोपे होईल.

(First Molecular image of b117 coronavirus mutation variant)