वाराणसीत मोदींसाठी पुन्हा एकदा लकी चेअर वापरणार

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीत गेल्या पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली खुर्ची पुन्हा एकदा बाहेर काढण्यात येणार आहे. भाजपसाठी ही खुर्ची शुभ मानली जाते. मोदींचा 8 मार्चला वाराणसी दौरा आहे. या दौऱ्यात मोदींना बसवण्यासाठी पुन्हा एकदा लकी चेअरचा वापर केला जाणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पंतप्रधान मोदी त्यांच्या वाराणसी या …

वाराणसीत मोदींसाठी पुन्हा एकदा लकी चेअर वापरणार

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीत गेल्या पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली खुर्ची पुन्हा एकदा बाहेर काढण्यात येणार आहे. भाजपसाठी ही खुर्ची शुभ मानली जाते. मोदींचा 8 मार्चला वाराणसी दौरा आहे. या दौऱ्यात मोदींना बसवण्यासाठी पुन्हा एकदा लकी चेअरचा वापर केला जाणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय.

पंतप्रधान मोदी त्यांच्या वाराणसी या मतदारसंघात शुक्रवारी विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी त्यांची जाहीर सभाही होईल. या कार्यक्रमात लकी चेअरचा वापर केला जाणार आहे. सभेसाठी पाच वर्षांपासून काचेच्या पेटीत बंद असलेली ही खुर्ची बाहेर काढण्यात आली असून तिची रंगरंगोटी आणि सजावट करण्यात येत आहे. 8 मार्चला होणाऱ्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खुर्चीवर बसावे आणि केंद्रात पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन व्हावे अशी भाजप नेत्यांची इच्छा आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशात 19 ऑक्टोबर 2013 मध्ये इंदिरा नगर येथील पहिल्या प्रचार सभेत मोदी याच खुर्चीवर बसले होते, असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. एप्रिल 2014 मध्ये कानपूरमधील कोयला नगरमध्ये झालेल्या सभेत मोदी पुन्हा या खुर्चीवर बसले. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला आणि मोदी पंतप्रधान बनले. सप्टेंबर 2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी निराला नगरमध्ये झालेल्या सभेतही मोदी या खुर्चीत बसले होते. यानंतर भाजपने उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला होता.

या खुर्चीचा वापर केल्यानंतर भाजपला फायदा होतो, अशी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही खुर्ची चर्चेचा मुद्दा बनली आहे. मोदींच्या दौऱ्यापूर्वी वाराणसीत जय्यत तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी वाराणसीत मोदींची ही शेवटची सभा असेल. त्यामुळे विविध विकासकामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *