घरात स्वामी विवेकानंदांचा फोटो लावलात तर भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत राहील- विप्लब देव

घरात स्वामी विवेकानंदांची तसबीर लागल्यास आपल्या पक्षाची विचारधारा आणि संस्कार टिकून राहतील.

घरात स्वामी विवेकानंदांचा फोटो लावलात तर भाजप पुढील ३० वर्षे सत्तेत राहील- विप्लब देव

आगरतळा: ईशान्य भारतातील ८० टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंदांची तसबीर लावली तर पुढील ३० वर्षे भाजप सत्तेत राहील, असे वक्तव्य त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लब देव यांनी केले आहे. यासाठी विप्लब देव यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना घरोघरी स्वामी विवेकानंदांच्या तसबिरी वाटण्याचे आवाहनही केले. माझ्या गावातील अनेक लोकांच्या घरात आजही ज्योती बसू, जोसेफ स्टॅलिन, माओ जेडोंग या नेत्यांच्या तसबिरी लावलेल्या आहेत. मग आपण घरात स्वामी विवेकानंदांची तसबीर लावू शकत नाही का, असा सवाल विप्लब देव यांनी कार्यकर्त्यांना विचारला. (Hang pictures of Swami Vivekanand at home says CM Biplab Kumar Deb)

ते शुक्रवारी एका कार्यक्रमात भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. घरात स्वामी विवेकानंदांची तसबीर लागल्यास आपल्या पक्षाची विचारधारा आणि संस्कार टिकून राहतील. त्रिपुराच्या ८० टक्के घरांमध्ये स्वामी विवेकानंदाची तसबीर असेल तर भाजपचे सरकार पुढील तीन दशके सत्तेत राहील, असा दावा विप्लब देव यांन केला.

स्वामी विवेकानंद कमी बोलायचे. त्यांनी आयुष्यभर शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. जास्त बोलल्याने आपल्या शरीरातील उर्जा नष्ट होते. त्यामुळे आपण बोलून ही उर्जा वाया घालवता कामा नये, असेही विप्लब देव यांनी सांगितले.

या कार्यक्रमात विप्लब देव यांनी महिला कार्यकर्त्यांना भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्याचे आवाहन केले. यापूर्वी विप्लब देव यांनी कोरोनाच्या रुग्णांना मानसिकदृष्ट्या खंबीर बनवण्यासाठी त्यांना स्वामी विवेकानंद यांच्यावर लिहण्यात आलेली पुस्तके वाटली होती.

विप्लब देव एरवी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. महाभारतकाळात इंटरनेट होते आणि व्हिडीओ कॉन्फरिन्सगद्वारे संजयाने धृतराष्ट्रास कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीचे वार्तांकन करून दाखविले, पाण्यात पोहणाऱ्या बदकांमुळे पाण्यामध्ये प्राणवायूचे प्रमाण वाढते, त्याचे पुनर्चक्रीकरण होते व त्यामुळे अन्य जलचरांना अधिक प्राणवायू मिळतो, अशा वक्तव्यांमुळे ते कायम चर्चेत असतात.

(Hang pictures of Swami Vivekanand at home says CM Biplab Kumar Deb)