मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनचे (आरकॉम) चेअरमन अनिल अंबानी या दोघांचाही व्यवसाय स्वतंत्र आहे. पण अडचणीत असलेल्या छोट्या भावाला वाचवण्यासाठी मुकेश अंबानी धावून आले. एरिक्सन या कंपनीला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे अनिल अंबानींवर तुरुंगात जाण्याची वेळ आली होती. पण ऐनवेळी 462 कोटींची मदत करत मुकेश अंबानींनी छोट्या भावाची मदत केली.
अनिल अंबानी यांची आरकॉम सध्या तोट्यात आहे. त्यातच स्वीडनच्या एरिक्सन या कंपनीने पैसे न दिल्यामुळे आरकॉमविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने पैसे देण्यासाठी कालावधी ठरवून दिला होता. अखेर या तारखेच्या आतच अनिल अंबानी यांनी मोठ्या भावाच्या मदतीने एरिक्सनला 462 कोटी रुपये दिले. या कठीण प्रसंगात साथ दिल्याबद्दल अनिल अंबानी यांचे मोठ्या भावाचे आभार मानले आहेत.
फेब्रुवारीमध्ये अनिल अंबानी हे सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी आढळले होते. एरिक्सनला पैसे देण्याचा आदेश त्यांनी पाळला नव्हता. यानंतर कोर्टाने चार आठवड्यांची मुदत देत, पैसे द्या किंवा तीन महिने तुरुंगात जा, असा आदेश दिला होता. या मुदतीपूर्वीच अनिल अंबानी यांनी एरिक्सनला पैसे दिले.
रिलायन्सची विभागणी झाल्यानंतर मुकेश अंबानी यांनी भावाच्या मदतीला धावून येण्याची ही दुसरी वेळ आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आरकॉमच्या वायरलेस एसेटची तीन हजार कोटी रुपयांना खरेदी केली होती. यामुळे कर्जातून सावरण्यास अनिल अंबानींच्या कंपनीला मोठा आधार मिळाला होता.
वन टाईम सेटलमेंट आणि व्याजासह एरिक्सनला एकूण 571 कोटी रुपये देणं होतं. यापैकी 118 कोटी रुपये फेब्रुवारीमध्येच देण्यात आले होते. एरिक्सनने 2014 मध्ये आरकॉमसोबत एक करार केला होता, पण यातील रक्कम न मिळाल्याने एरिक्सनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अखेर मुकेश अंबानी यांच्या मदतीने आरकॉमने सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
रिलायन्स जिओने दूरसंचार क्षेत्रात एंट्री केल्यापासून जवळपास सर्वच कंपन्यांची अडचण वाढली आहे. आरकॉमची परिस्थितीही वेगळी नाही. जिओमुळे आरकॉमचे ग्राहक कमी झाले आहेत.
कमेंट करा