काँग्रेसप्रणित आघाडीकडून लोकशाहीची गळचेपी, पुन्हा एकदा लाज आणली : अमित शाह

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:55 AM, 4 Nov 2020
काँग्रेसप्रणित आघाडीकडून लोकशाहीची गळचेपी, पुन्हा एकदा लाज आणली : अमित शाह

नवी दिल्लीः अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामींना अटकही करण्यात आली असून, अनेक स्तरांतून या अटकेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांनीही महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसप्रणित आघाडीकडून महाराष्ट्रात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे, पुन्हा एकदा त्यांनी लाज आणल्याची घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.(Amit Shah Criticize On Congress)

रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य सत्तेचा स्पष्टपणे गैरवापर करत आहे. तसेच हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असून, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. या कृत्यानं पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण करून दिली आहे. मुक्त प्रेसवरील हल्ला असून त्याचा प्रतिकार केला जाईल, असंही अमित शाहा यांनी स्पष्ट केले आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काम करणारी कॉंग्रेस अजूनही आपत्कालीन स्थितीत आहेत. याचा पुरावा आज महाराष्ट्रातील त्यांच्या सरकारने दाखविला आहे. लोक यास लोकशाही मार्गाने उत्तर देतील, असंही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटलं आहे.

2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी- राम कदम

Arnab Goswami Arrested LIVE | सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार, अर्णव गोस्वामींच्या अटकेवरुन कंगनाचा घणाघात