सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची अनिल अंबानींसाठी वकिली

सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांची अनिल अंबानींसाठी वकिली

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात एक खटला लढत आहेत. एकीकडे काँग्रेस राफेल प्रकरणावरुन अनिल अंबानींवर टीका करत आहे, तर दुसरीकडे त्यांचेच नेते सुप्रीम कोर्टात अनिल अंबानींना वाचवण्यासाठी लढत असल्याचं पाहून सोशल मीडियावर कपिल सिब्बल यांना जोरदार ट्रोल करण्यात आलं.

कपिल सिब्बल मंगळवारी सकाळी सुप्रीम कोर्टात अनिल अंबानी यांच्या वतीने हजर होते. एरिक्सन इंडिया प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याचं हे प्रकरण आहे. एरिक्सनने थकीत पैशांप्रकरणी अनिल अंबानींविरोधात खटला दाखल केलाय. अनिल अंबानी आणि रिलायन्स कम्युनिकेशनने थकबाती दिल्याविनाच स्वतःला दिवाळखोर घोषित केलं, जे की सुप्रीम कोर्टाच्या नियमाविरोधात आहे, असा एरिक्सनचा दावा आहे.

मंगळवारी अनिल अंबानी स्वतः सुप्रीम कोर्टात हजर होते. सोबतच त्यांचे वकील कपिल सिब्बलही होते. यापूर्वीच कपिल सिब्बल यांनी राफेल प्रकरणावरुन अनिल अंबानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. सिब्बल यांनी ट्वीट केलं होतं, की “असं वाटतंय की एअरबस, फ्रान्स सरकार आणि अनिल अंबानी या सर्वांनाच माहित होतं, की पंतप्रधान मोदी 9-11 एप्रिल 2015 दरम्यान फ्रान्ससोबत एमओयू करणार आहेत.” ट्वीटसोबतच सिब्बल यांनी एक पत्रही सादर केलं होतं, जे कथितपणे युरोपियन कंपनी एअरबेसच्या अधिकाऱ्याने लिहिल्याचा दावा आहे. यामध्ये एका ईमेलचाही हवाला देण्यात आला होता, जो काँग्रेसने पुरावा म्हणून सादर केला आणि दावा केला की एमओयूबाबत अनिल अंबानी यांना अगोदरच माहिती होती.

एकीकडे अनिल अंबानी यांच्यावर टीका आणि सुप्रीम कोर्टात त्यांच्याच वतीने खटला लढणं यामुळे कपिल सिब्बल ट्रोल झाले. अनेक युझर्सने कपिल सिब्बल यांच्या दुहेरी भूमिकेबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केलं. तर राफेल प्रकरणाच्या अगोदरपासूनच आपण अनिल अंबानींसाठी वकिली करत असल्याचं सिब्बल म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *