Constitution Day | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्मितीत सहाय्य करणाऱ्या 15 स्त्रिया

देशाच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी सध्याची राज्यघटना विधिवतपणे स्वीकारली गेली.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:00 PM, 26 Nov 2020

मुंबई : दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांनी देशाचे संविधान लिहिल्याचे सर्वश्रुत आहेच. मात्र संविधान निर्माण करण्यासाठी तयार केलेल्या संविधान सभेत देशभरातील 15 महिलांचाही समावेश होता. यापैकी प्रमुख महिलांविषयी जाणून घेणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Constitution Day Special 15 Women who helped draft the Indian constitution)

देशाच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी सध्याची राज्यघटना विधिवतपणे स्वीकारली गेली. त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. भारतीय राज्यघटनेत सर्व वर्गाचे हित लक्षात घेऊन विस्तृत तरतुदींचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणांद्वारे बदलत्या परिस्थितीनुसार विविध अधिकारांचा त्यात समावेश करण्यात आला.

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त 2015 मध्ये 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सामाजिक न्याय मंत्रालयाने अधिसूचना जारी केली. घटनात्मक मूल्यांबाबत नागरिकांमधील आदराची भावना निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

संविधान निर्मितीमागील अग्रणी महिला

स्वातंत्र्य सेनानी आणि पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू यांचंही संविधान निर्माण करण्यात महत्त्वाचं योगदान आहे. ‘नाईटिंगल ऑफ इंडिया’ अशी उपाधी त्यांना बहाल करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अम्मू स्वामीनाथन यांचाही संविधान सभेत सहभागी झालेल्या अग्रणी महिलांमध्ये समावेश होतो. स्वामीनाथन यांनी समाजसेविका म्हणून आपले आयुष्य व्यतीत केले.

देशातील सुधारवादी, समाजसेवक, शिक्षक आणि स्वातंत्र्यसैनिक असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व हंसा मेहता या सभेच्या भाग होत्या. त्यांच्यासोबत दुर्गाबाई देशमुखही संविधान सभेच्या सदस्या होत्या. स्वातंत्र्यसेनानी आणि सुधारवादी कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशमुख वकील होत्या.

मुस्लीम समाजाच्या वतीने बेगम एजाज रसूल या एकमेव संविधान सभा सदस्य होत्या. रसूल त्या काळातील एक प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञ होत्या. नंतर त्यांनी बरीच महत्त्वाची पदेही भूषवली. स्वातंत्र्यसैनिक आणि खासदार अ‍ॅनी मॅस्करिनही संविधान सभेत कार्यरत होत्या.

अनुसूचित जाती जमातीचा आवाज कणखर करणाऱ्या दक्षायनी वेलायुधन या देखील संविधान सभेच्या सदस्य होत्या. नंतर त्या संसदेच्या सदस्यही झाल्या. ओदिशाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मालतीदेवी चौधरीही संविधान सभेच्या सभासद होत्या.

सुप्रसिद्ध स्त्रीवादी, सुधारक लीला रॉय याही संविधान सभेच्या सदस्य होत्या. देशाच्या सुप्रसिद्ध राजकारणी असलेल्या राजकन्या अमृत कौर यांचेही नाव या यादीत आहे. देशाच्या पहिल्या केंद्रीय मंत्री विजय लक्ष्मी पंडित आणि स्वातंत्र्यसेनानी रेणुका राय यांची नावेही संविधान सभा सदस्यांमध्ये होती.

देशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानीसुद्धा संविधान सभेच्या भाग होत्या. यासह स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी पूर्णिमा बॅनर्जीही संविधान सभेत सक्रिय होत्या.

संबंधित बातम्या :

जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा; चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री 

(Constitution Day Special 15 Women who helped draft the Indian constitution)