दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू

देशाची राजधानी दिल्लीमध्ये तासाला 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 21:44 PM, 16 Nov 2020
दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला; प्रत्येक तासाला 4 रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीमध्ये तासाला 4 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रविवारी दिवसभरात 95 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नोव्हेंबर महिन्यात कोरोनामुळे आतापर्यंत 1103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Corona infection increased in Delhi, death rate of corona is 4 patient per hour)

देशात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याचे दिसत आहे. मात्र, देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दिल्लीमध्ये रविवारी कोरोनामुळे 95 जणांचा मृत्यू झाला. मागील 15 दिवसांपासून दिल्लीमध्ये दिवसाला सरासरी 73.5 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. म्हणजे प्रत्येक तासाला सरासरी 3 बाधितांचा मृत्यू होत आहे. मागील गुरुवारी दिल्लीमध्ये सर्वात जास्त 104 रुग्णांचा मृत्यू झाला होता. शनिवारी 96 बाधितांचा मृत्यू झाला.

दिल्लीमध्ये आतापर्यंत 7614 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून हा मृत्युदर 1.5 टक्क्यांवर आहे. दिल्लीमध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा संसर्ग वाढून एप्रिल महिन्यात प्रत्येत दिवसाला दोन बाधितांचा मृत्यू झाला. पुढे हा आकडा वाढत जाऊन मे महिन्यात 414 जणांच्या मृत्यूची नोंद केली गेली. म्हणजे एप्रिल महिन्यात दिवसाला सरासरी मृत्यूंचे प्रमाण 2 वरुन मे महिन्यात थेट 13 वर पोहोचले होते.

त्यानंतर मे महिन्यानंतर दिल्लीतील कोरोना संसर्गाचा आलेख चांगलाच वर गेला. एकट्या जून महिन्यात कोरोनामुळे तब्बल 2269 बाधितांचा मृत्यू झाला होता. म्हणजे जून महिन्यात दिवसाला सरासरी 75 बाधितांचा मृत्यू झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दिल्लीमध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचे आढळले. कोरोना आटोक्यात आल्याचे सांगितले जाऊ लागले. मात्र, अनलॉक अंतर्गत सर्व व्यवहार सुरळीत होत असल्याने कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. सध्या दिल्लीमध्ये तासाला सरासरी 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होत आहे.

संबंधित बातम्या :

दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Photo ! कोरोनाचा धोका; तरीही मुंबई ते दिल्ली खरेदीसाठी तुफान गर्दी

(Corona infection increased in Delhi, death rate of corona is 4 patient per hour)