सण-उत्सव साजरे करण्यासाठी जिवंत राहणे गरजेचं, दिल्ली हायकोर्टाने ठणकावलं, छठ याचिका फेटाळली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने देशाची राजधानी दिल्लीतील नदी किनाऱ्यांवर छठ पूजेचे कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देण्यास नकार दिलाय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:15 PM, 18 Nov 2020
सण-उत्सव साजरे करण्यासाठी जिवंत राहणे गरजेचं, दिल्ली हायकोर्टाने ठणकावलं, छठ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने देशाची राजधानी दिल्लीतील नदी किनाऱ्यांवर छठ पूजेचे कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देण्यास नकार दिलाय. कोणत्याही धर्मातील सण-उत्सव साजरे करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्ही जीवंत राहणं गरजेचं आहे, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं. तसेच छठ पूजेच्या कार्यक्रमांसाठी परवानगी मागणारे याचिकाकर्ते दिल्लीतील परिस्थितीबाबत अनभिज्ञ असल्याचं म्हणत न्यायालयाने त्यांचे कान टोचले (Delhi High Court denies Chhath Pooja programs in Public places in Delhi amid Corona).

दिल्लीमध्ये सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत छठ पूजेवरुन राजकीय पारा चढायला लागला आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना जमा होणं धोक्याचं असल्याचं सांगत छठ पूजेला परवानगी नाकारली आहे. तर भाजपने यावरुन केजरीवाल सरकारवर सडकून टीका केली आहे.

केजरीवाल सरकारने दिल्लीत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी छठ पूजेचं आयोजन न करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, छठ पूजा आयोजन करणाऱ्या समिती आणि संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय. भाजपने देखील केजरीवाल सरकारच्या या निर्णयाला विरोध करत छठ पूजेला परवानगी देण्याची मागणी केलीय. यानंतर आयोजकांकडून दिल्ली उच्च न्यायालयात या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली. आता न्यायालयाने देखील याचिकाकर्त्यांचे कान टोचत परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. दिल्ली सरकारने काही प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. दिल्लीतील गर्दीची ठिकाणे अनिश्चित काळासाठी बंद करण्याची परवानगी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे मागितली आहे तसंच दिल्लीतील कन्टेन्मेंट झोनमध्ये पुन्हा टाळेबंदी करण्याच्या विचारात केजरीवाल सरकार आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकार चिंतेत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जी पावले उचलायला हवीत, आम्ही ती उचलतो आहोत, असं सांगत कोरोनासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याचे संकेत केजरीवाल यांनी दिले. तसंच लग्नसोहळ्यासाठी 200 जणांना उपस्थिती लावण्याची परवानगी दिल्ली सरकारने दिली होती, ती देखील आता माघारी घेण्यात आली आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्सची संख्या पुरेसी आहे. परंतु आयसीयूमध्ये बेडची कमतरता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत केली आह, असंही केजरीवाल यांनी सांगितलं. “केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून काम करत आहे परंतु सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बरेच लोक मास्कशिवाय फिरत आहेत. माझं त्यांना आवाहन आहे की कृपया मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा”, असं केजरीवाल म्हणाले.

संबंधित बातम्या

दिल्लीची कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच, वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल सरसावले

पुढच्या 10 दिवसांत दिल्लीतील कोरोना नियंत्रणात येण्याची अपेक्षा : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

Corona | नवी दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट, संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरा, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

Delhi High Court denies Chhath Pooja programs in Public places in Delhi amid Corona