तारकिशोर आणि रेणू देवींना उपमुख्यमंत्रिपद; भाजपचा ‘हा’ आहे गेम प्लान!

तारकिशोर हे वैश्य समुदायाचे प्रतिनिधित्व करत असून, रेणू देवी यांना पुढे आणण्यात मागासवर्गीय महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं भाजपचं धोरण असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:57 PM, 16 Nov 2020
तारकिशोर आणि रेणू देवींना उपमुख्यमंत्रिपद; भाजपचा 'हा' आहे गेम प्लान!

पाटणाः जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार यांनी सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता बिहारचे 37 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांना संधी देण्यात आली आहे. तारकिशोर प्रसाद यांची भाजपकडून विधिमंडळाचे नेते आणि रेणू देवी यांची उपनेतेपदी निवड झाल्यानंतर त्या दोघांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. बिहारमध्ये भाजपकडून दोघांनाही उपमुख्यमंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. तारकिशोर हे वैश्य समुदायाचे प्रतिनिधित्व करत असून, रेणू देवी यांना पुढे आणण्यात मागासवर्गीय महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं भाजपचं धोरण असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Deputy Cm in Bihar Bjp Tarkishor Prasad Renu Devi Political Benefits Caste Future Politics)

वैश्य समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे भाजप नेते

भाजपने उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिलेले तारकिशोर प्रसाद कटिहार विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. सलग चार टर्म ते या मतदारसंघातून विजयी झालेत. कटिहार सोबत पुर्णिया, भागलपूर या जिल्ह्यांमध्येही ते लोकप्रिय आहेत. विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार तारकिशोर प्रसाद करोडपती आहेत. त्याची एकूण संपत्ती 1.9 कोटी इतकी आहे. तारकिशोर बारावी पास आहेत. कटिहार विधानसभा मतदारसंघात त्यांनी राजदच्या डॉ. राम प्रकाश महतो यांचा पराभव केला.

तारकिशोर वैश्य समाजाचे प्रतिनिधित्व करतात. वैश्य समाज भाजपची वोट बँक मानली जाते. बिहारमध्ये वैश्य समाजातील एकूण 24 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी 15 आमदार भाजपकडून विजयी झालेत. तारकिशोर प्रसाद यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही काम केले आहे. सुशील कुमार मोदी यांचे निकटवर्तीय असल्यामुळे नितीश कुमार आणि तार किशोर प्रसाद यांच्यात चांगला समन्वय राहील, अशी अपेक्षा भाजप नेत्यांना आहे.

अतिमागास आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी रेणू देवींना संधी

बिहार विधानसभा निवडणुकीत 74 जागा मिळवणाऱ्या भाजपची नजर अतिमागास समाजातील मतदार आणि महिलांवर आहे. रेणू देवी यांना संधी देऊन भाजप हे समीकरण प्रत्यक्षात उतरणार आहे. रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. बिहारमधील नोनिया, बिंद, मल्लाह, तुरहा या अतिमागास जातींमधील मतदारांमध्ये भाजपची विचारसरणी रुजवण्यासाठी भाजपकडून रेणू देवी यांना संधी देण्यात आली आहे.

अमित शाहांच्या टीममध्ये त्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिल्या आहेत. भाजपचा मजबूत बालेकिल्ला असलेल्या चंपारण प्रदेशात त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचे मानले जाते. बिहारमध्ये जेडीयू हा मागास मतदारांचा गड समजला जातो. तसेच महिलांमध्येही नितीश कुमारांची चांगली पकड आहे. या निवडणुकीत एनडीएच्या विजयात महिलांची भूमिका खूप महत्त्वाची होती, अशा परिस्थितीत महिलांना सोबत ठेवण्याची भाजपची मनीषा आहे.

रेणू देवी यांनी दुर्गा वाहिनीसमवेत आपला राजकीय प्रवास केला. त्या बचतगटांच्या माध्यमातून महिलांमध्ये कार्यरत आहेत. भाजपच्या महिला मोर्चामध्ये संघटनेतील कार्यकर्त्यापासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंतच्या राज्यातील महिलांमध्येही त्यांची चांगली ओळख आहे. इतकेच नव्हे तर 90 च्या दशकात राम मंदिर आंदोलन आणि 1992 मध्ये जम्मू-काश्मीर तिरंगा यात्रेतही त्यांचा सहभाग होता. अशा प्रकारे रेणू देवीदेखील भाजपच्या अजेंड्यात बसतात. अशा परिस्थितीत त्यांना उपमुख्यमंत्री बनवून मागासवर्गीय आणि महिलांना राजकीय संदेश पाठविण्याचा भाजपनं प्रयत्न केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

10 नोव्हेंबर रोजी बिहार निवडणुकीचा निकाल लागला होता. या निवडणुकीत राजदला सर्वाधिक म्हणजे 75 तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. एनडीएला बिहार निवडणुकीत बहुमत मिळाल्याने अखेर नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार आज नितीश कुमार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह राजभवनात पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

बिहारमधील पक्षीय बलाबल

भाजप – 74
जेडीयू – 43
आरजेडी – 75
काँग्रेस – 19
एमआयएम – 05
CPI (ML) – 12
CPI (अन्य) – 4
हिंदुस्तान आवाम मोर्चा – 04
विकासशील इन्सान पार्टी – 04
अपक्ष/इतर – 03
एकूण – 243

संबंधित बातम्या:

नितीशकुमार बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, शाह-फडणवीस पाटण्यात

नितीशकुमार हे शरद पवारांसारखे; सहजासहजी कुणाच्या हाती लागणार नाहीत: राऊत

बिहारचे मुख्यमंत्री होणार का?; नितीशकुमार म्हणतात…