बिहार निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना 'अच्छे दिन'; 282 कोटींच्या इलेक्टोरल बाँडसची विक्री

यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या उत्पन्नाचे स्रोत आटले होते. तरीही बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय पक्षांना मोठ्याप्रमाणात आर्थिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे. | Bihar elections 2020

बिहार निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना 'अच्छे दिन'; 282 कोटींच्या इलेक्टोरल बाँडसची विक्री

नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांना मोठ्याप्रमाणात देणग्या मिळाल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI तब्बल 282 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बाँडसची Electoral bonds विक्री केली.  2018 मध्ये राजकीय पक्षांना गुप्तपणे देणग्या देण्यासाठी इलेक्टोरल बाँडसची संकल्पना अस्तित्त्वात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत या इलेक्टोरल बाँडसच्या माध्यमातून राजकीय पक्षांना 6,493 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. (Electoral bonds selling before of Bihar elections 2020)

यंदाची बिहार विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे लक्षणीय ठरली होती. कोरोनाच्या संकटानंतर देशात होणारी ही पहिलीची निवडणूक होती. एरवी निवडणुकांच्या काळात बरीच आर्थिक उलाढाल होते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांच्या उत्पन्नाचे स्रोत आटले होते. तरीही बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय पक्षांना मोठ्याप्रमाणात आर्थिक देणग्या मिळाल्याचे समोर आले आहे.

‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती अधिकारातंर्गत माहिती मागितली होती. त्याला उत्तर देताना स्टेट बँक ऑफ इंडियाने बिहार निवडणुकीपूर्वी 282 कोटींच्या इलेक्टोरल बाँडसची विक्री झाल्याचे सांगितले. 19 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या काळात ही विक्री झाली. यामध्ये 1 कोटी रुपयाच्या 279 आणि 10 लाख रुपये रकमेच्या 32 बाँडसचा समावेश आहे.

यापैकी 130 कोटी रुपयांच्या बाँडसची विक्री ही मुंबईतील स्टेट बँकेच्या मुख्यालयातून झाली होती. तर स्टेट बँकेच्या दिल्ली शाखेतून 11.99 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँडस विकले गेले. याशिवाय, पाटणा येथील शाखेतून 80 लाख रुपयांचे बाँडस विकण्यात आले. त्यानंतर तीन शहरांमध्ये काही बाँडस वटवण्यातही आले. भुवनेश्वरमध्ये 67 कोटी, चेन्नईत 80 कोटी आणि हैदराबादमध्ये 90 कोटी रुपये इलेक्टोरल बाँडसच्या माध्यमातून काढण्यात आल्याची माहितीही स्टेट बँकेने दिली आहे.

इलेक्टोरल बाँडस म्हणजे काय?
इलेक्टोरल बाँडसच्या माध्यमातून एखादी व्यक्ती राजकीय पक्षांना गुप्तपणे देणगी देऊ शकते. 2018 मध्ये भारतात ही संकल्पना अस्तित्त्वात आली. इलेक्टोरल बाँडस इश्यू झाल्यापासून 15 दिवसांसाठी वैध असतात. ज्या पक्षाला देणगी देण्यात आली आहे तोच पक्ष अधिकृत खात्यातून इलेक्टोरल बाँडस वटवू शकतो.

देणगी देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने 1000, 10000, एक लाख, 10 लाख आणि एक कोटी अशा वेगवेगळ्या किंमतीचे बाँडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहक हे बाँडस खरेदी करून राजकीय पक्षांना देतात. त्यानंतर राजकीय पक्ष हेच बाँडस पुन्हा बँकेला विकून पैसे घेतात.

2018 पासून देशात आतापर्यंत 6,493 कोटीच्या इलेक्टोरल बाँडसची विक्री झाली आहे. यापैकी 2018 मध्ये 1,056.73 कोटी, 2019 मध्ये 5,071.99 कोटी आणि 2020 साली 363.96 कोटी बाँडसची विक्री झाली.

संबंधित बातम्या:

एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?

Facebook ला जाहिरात देण्यात भाजप सर्वात पुढे, टॉप 10 मध्ये काँग्रेस-AAP चाही समावेश

(Electoral bonds selling before of Bihar elections 2020)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *