कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कर्णन यांना अटक

एका ऑनलाईन व्हिडीओप्रकरणी कर्णन यांना अटक करण्यात आली आहे. | CS Karnan

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:00 PM, 2 Dec 2020
Former High Court Judge CS Karnan Arrested For Offensive Remarks On Judges Wives

चेन्नई: कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सीएस कर्णन (CS Karnan) यांना आज अटक करण्यात आली आहे. चेन्नई पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने ही अटक केली आहे. (Retired Justice Karnan Arrested by TN Police Over Offensive Social Media Posts Against Judiciary)

एका ऑनलाईन व्हिडीओप्रकरणी कर्णन यांना अटक करण्यात आली आहे. या व्हिडीओतून शिवीगाळ करण्याचा आणि न्यायाधीशांच्या पत्नींना बलात्काराची धमकी दिल्याचा त्यांच्यावर आोरप ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्यामध्ये मद्रास उच्च न्यायालयात तामिळनाडू बार कौन्सिलने एक याचिका दाखल केली होती.

या याचिकेत मद्रास आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश सीएस कर्णन यांच्या विरोधात न्यायाधीशांच्या पत्नी, महिला वकील आणि न्यायालयातील महिला कर्मचाऱ्यांना बलात्काराची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. कर्णन यांच्या एका कथित व्हायरल व्हिडीओच्या आधारे न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली होती.

हा व्हिडीओ पुरावा म्हणून ग्राह्य धरून त्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. तसेच न्याय यंत्रणेसाठी कर्णन धोकादायक ठरत असल्याचा दावाही बार काऊन्सिलने केला.

27 ऑक्टोबरला चेन्नईतील सायबर पोलिसांकडून सीएस कर्णन यांच्याविरोधात एक खटला दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ वकिलांकडून मद्रास उच्च न्यायालयाला पाठवण्यात आलेल्या एका पत्राच्या आधारे हा खटला दाखल करण्यात आला. कर्णन यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचे व्हीडिओ मध्यंतरी व्हायरल झाले होते.

यापूर्वी 19 नोव्हेंबरला या खटल्याची सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायमूर्ती एम. सत्यनारायणन आणि न्यायमूर्ती हेमलता यांनी सीएस कर्णन यांच्या वर्तनाविषयी नाराजी व्यक्त केली होती. सीएस कर्णन यांनी संवैधानिक पद भूषविलेले असून त्यांनी महिलांविषयी अशाप्रकारचे उद्गार काढणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे न्यायालयाने म्हटले.

‘सीएस कर्णन यापूर्वीही गेले होते तुरुंगात’

यापूर्वी 2017 मध्ये सात सदस्यीय खंडपीठाने सीएस कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या तुरुंगवासाठी शिक्षा ठोठावली होती. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी सहा महिने बाकी असताना हा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी सीएस कर्णन यांनी आपण दलित असल्यामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले होते.

(Retired Justice Karnan Arrested by TN Police Over Offensive Social Media Posts Against Judiciary)