
Gym And Health : आपली देहयष्टी आकर्षक आणि रुबाबदार असावी असे प्रत्येकालाच वाटते. त्यामुळेच आजकाल काही तरुण जीममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. काही काही तरुण तर दिवसातले दोन ते तीन तास जीममध्ये व्यायाम करण्यात घालवतात. दरम्यान जीममध्ये जाऊन व्यायाम करण्याची आवड असणाऱ्या अशाच एका हौशी व्यक्तीसोबत धक्कादायक प्रसंग घडला आहे. त्याने जीमवरून आल्यानंतर अर्धवट तळलेले (हाफ फ्राय) अंडे खाल्ल्याने पुढच्याच आर्ध्या तासात त्याचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इंदौरमधील बाणगंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खातीपुरा भागातील संदीप नावाच्या 32 वर्षीय युवकाचा अचानक मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संदीप रोजच्या प्रमाणेच संध्याकाळी जीम करायला गेला होता. एका तास व्यायाम केल्यानंतर त्याने पल्या दुकानावर जाऊन हाफ फ्राय अंडे खाल्ले होते. अंडे खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने त्याचा मृत्यू झाला. संदीप गेल्या सहा वर्षांपासून जीम करतो. त्यामुळे त्याच्याकडे जीम करण्याचा मोठा अनुभव आहे. सकाळी उठून व्यायाम करण्याची त्याला सवय होती. तो ज्या भागात राहायचा त्याच भागात त्याचे एक दुकान होते. या दुकानात तो अंड्यांची विक्री करायचा. मंगळवारी (5 नोव्हेंबर) संध्याकाळी तो नेहमीप्रमाणे जीम करून आला. त्यानंतर दुकानात जाऊन त्याने हाफ फ्राय अंडे बनवले आणि तिथेच खाल्ले. त्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला. घरी मात्र त्याच्यासोबत विचित्र घडलं.
घरी गेल्यानंतर त्याला जळजळ व्हायला लागलं. सोबतच त्याला घबराट झाल्यासारखं वाटू लागलं. अंडे खाल्ल्यामुळे हा त्रास होत असावा, असे त्याला वाटले. त्याने थोडा वेळ अराम करायचे ठरवले. मात्र त्याची प्रकृती जास्तच बिघडत गेली. त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. नंतर लगेच त्याच्या लहान भावाने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी संदीपला मृत घोषित केले.
दरम्यान, जीमवरून आल्यानंतर हाफ फ्राय अंडे खाल्ल्यानंतर संदीपचा मृत्यू झाल्यामुळे आता वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. जीमवरून आल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह वाढलेला असतो. सोबतच हृदयाची धडधडही वाढलेली असते. त्यामुळे जीमवरून लगेच आल्यानंतर तळलेले पदार्थ खावेत की नाही? असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.