जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात, 35 जणांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज (1 जुलै) सकाळी भीषण बस अपघात झाला. यात आतापर्यंत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी झाले.

जम्मू काश्मीरमध्ये भीषण बस अपघात, 35 जणांचा मृत्यू

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात आज (1 जुलै) सकाळी भीषण बस अपघात झाला. यात आतापर्यंत 35 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर 22 जण जखमी झाले. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

किश्तवाडचे जिल्हाधिकारी अंगरेज सिंह राणा म्हणाले, “हा अपघात सकाळी 8.40 वाजता झाला. ही बस केशवान परिसरातून किश्तवाडला जात होती. त्यावेळी या मिनी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस सिर्गवाडी गावाजवळ खोल दरीत पडली.”

जखमींना विशेष उपचारासाठी विमानाने जम्मू येथील राजकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर मदत आणि बचाव कार्यात स्थानिक लोकही सहभागी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्‍यपाल मलिक यांनी अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेला दुखद म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींच्या लवकर तंदुरुस्तीसाठी प्रार्थना केली. राज्‍याचे माजी मुख्‍यमंत्री उमर अब्‍दुल्‍ला यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच मृत्यूंच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते गुलाम नबी आजाद यांनी घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना राज्य शासनाकडे जखमींना उपचारासाठी तत्काळ मदत देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, याआधी डोडा, किश्तवाड, राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांमध्ये अशा अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असणे, अधिकचा वेग आणि खराब रस्ते अशी यामागील कारणे असल्याचे सांगितले जाते. 27 जूनला मुगल रोड येथील पीर गली क्षेत्रात झालेल्या अपघातात एका संगणक प्रशिक्षण संस्थेच्या 11 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. मुगल रोड जम्मू क्षेत्रातील राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांना जोडणारा भाग आहे.

कुल्लू जिल्ह्यातही प्रवाशांना भरगच्च बसचा अपघात झाला होता. त्यात 44 प्रवाशांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त 35 प्रवाशी गंभीर जखमी झाले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *