देशाच्या स्वाभिमानासाठी मोदींना मत द्या, 400 साहित्यिकांचं आवाहन

नवी दिल्ली : विविध भाषेतील 200 लेखकांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ 400 पेक्षा जास्त लेखक मैदानात उतरले आहेत. देशाचा स्वाभिमान, अखंडता आणि एकतेसाठी मोदींना मतदान करा, असं आवाहन या साहित्यिकांनी केलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली यांच्यासह 400 पेक्षा जास्त साहित्यिकांचा यामध्ये समावेश आहे. …

देशाच्या स्वाभिमानासाठी मोदींना मत द्या, 400 साहित्यिकांचं आवाहन

नवी दिल्ली : विविध भाषेतील 200 लेखकांनी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ 400 पेक्षा जास्त लेखक मैदानात उतरले आहेत. देशाचा स्वाभिमान, अखंडता आणि एकतेसाठी मोदींना मतदान करा, असं आवाहन या साहित्यिकांनी केलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक नरेंद्र कोहली, चित्रा मुद्गल, सूर्यकांत बाली यांच्यासह 400 पेक्षा जास्त साहित्यिकांचा यामध्ये समावेश आहे.

भारतीय साहित्यिक संघटना या बॅनरखाली एकत्रित झालेल्या साहित्यिक आणि विचारवंतांनी भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलंय. मतदारांनी त्यांचं मत देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान आणि विकास कायम राखण्यासाठी द्यावं, असं या साहित्यिकांनी म्हटलंय.

“भारतीय लोकशाहीमध्ये घटनेला सर्वोच्च महत्त्व आहे. आम्ही सर्व साहित्यिक देशवासियांना आवाहन करतो, की तुमचं मूल्यवान मत देशाची अखंडता, सुरक्षा, स्वाभिमान, संप्रभुता, सांप्रदायिक सद्भाव आणि सर्वांगिण विकास कायम राखण्यासाठी द्या,” असं या साहित्यिकांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय. या आवाहनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगात भारताची प्रतिष्ठा वाढवणारा, राष्ट्रीय सुरक्षेसाठी प्रतिबद्ध आणि समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा प्रवाह पोहोचवणारा नेता, असा उल्लेख करण्यात आलाय.

यापूर्वी इंडियन रायटर्स फोरमकडून जारी करण्यात आलेल्या आवाहनामध्ये विविध भाषांमधील 200 पेक्षा जास्त लेखकांनी द्वेषाच्या राजकारणाविरोधात मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गिरीश कर्नाड, रोमिला थापर, अमिताव घोष, नयनतारा सेहगल आणि अरुंधती रॉय यांसारख्या साहित्यिकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोपही केले होते.

लेखक, कलाकार, सिनेकलाकार, संगीतकार आणि अन्य सांस्कृतीक व्यक्तींना धमकावलं जातं आणि त्यांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप या लेखकांनी केला होता. सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला त्रास दिला जातो किंवा हास्यास्पद आरोपांमध्ये अटक होण्याचा धोका असतो. आम्हा सर्वांना वाटतं की यामध्ये बदल व्हावा. पहिलं पाऊल हे असेल, की जे आपण लगेच उचलू शकतो. द्वेषाच्या राजकारणाला मुळापासून उखडून फेका आणि यासाठी आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी विविधतापूर्ण आणि समान भारतासाठी मतदान करावं, असं पत्रक मोदींच्या विरोधातील साहित्यिकांनी जारी केलं होतं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *