बलाढ्य INS विक्रमादित्यवर आग, धुरामुळे लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

बलाढ्य INS विक्रमादित्यवर आग, धुरामुळे लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू

बंगळुरु : भारताचं सर्वात मोठं विमानवाहक जहाज आयएनएस विक्रमादित्यवर शुक्रवारी अग्नितांडव पाहायला मिळालं.  या अग्नितांडवात नौसेनेच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आयएनएस विक्रमादित्य कर्नाटकच्या कारवार बंदराजवळ पोहोचत होती, त्यावेळी या जहाजावर आग लागली. त्यानंतर लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान यांच्या नेतृत्त्वात आग विझवण्याचे प्रयत्न सुरु झाले. तात्काळ आग विझवण्याचे प्रयत्न केल्याने जहाजाचं मोठं नुकसान होण्यापासून टळलं आहे. मात्र, या आगीच्या धुरामुळे लेफ्टनंट कमांडर डी.एस. चौहान बेशुद्ध झाले. नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ कारवारच्या नौसेनेच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जहाजावर आग लागल्यानंतर काहीच वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात नौसेनेच्या जवानांना यश आलं. या दुर्घटनेत जहाजाच्या लढाऊ क्षमतेला कुठल्याही प्रकारचं मोठं नुकसान झालेलं नाही, असं नौसेनेकडून सागंण्यात आलं. आयएनएस विक्रमादित्यवर लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास करण्यासाठी नौसेनेने चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

आयएनएस विक्रमादित्य

आयएनएस विक्रमादित्य हे जहाज भारतीय नौसेनेतील एक विमानवाहक जहाज आहे. आयएनएस विक्रमादित्य हे 16 नोव्हेंबर 2013 रोजी भारतीय नौसेनेत औपचारिकपणे रुजू झालं. याआधी विक्रमादित्य हे सोव्हियेत संघाच्या आरमारात होते. आयएनएस विक्रमादित्य हे कीयेव प्रकारच्या विमानवाहक नौकांपैकी एक आहे. हे जहाज 1978-82  दरम्यान युक्रेनमधील ब्लॅक सी शिपयार्ड येथे बांधण्यात आलं. भारतीय आरमारात दाखल होण्यापूर्वी रशियातील सेव्हेरोद्विन्स्क येथील सेवमाश गोदीमध्ये याची जहाजाची पुनर्बांधणी करण्यात आली. या जहाजामुळे यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI