कोरोना लस निर्मिती केंद्राचा दौरा करणाऱ्या पंतप्रधान मोदींचं आनंद शर्मांकडून कौतुक, काँग्रेस बॅकफुटवर!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी कोरोना लस निर्मिती केंद्राचा दौरा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस प्रवक्त रणदीप सुरजेवाला यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:59 PM, 30 Nov 2020

नवी दिल्ली: काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी कोरोना लस निर्मिती केंद्राचा दौरा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केल्यानंतर आता काँग्रेस बॅकफुटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. आनंद शर्मा हे काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आहेत. त्याचबरोबर ते पक्षातील त्या 23 नेत्यांपैकी आहेत, ज्यांनी पक्षातील सुधारणांबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. दरम्यान, आनंद शर्मा यांनी मोदींचं कौतुक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस प्रवकर्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.(Anand Sharma praises Modi, while Randeep Surjewala criticizes)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर रोजी झायडस कॅडिला, भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या कोरोना लस निर्मिती कंपन्यांचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी लसीच्या निर्मीती प्रक्रियेची माहिती घेत, लस बाजारात कधी येऊ शकते याचा आढावा घेतला. त्यावर आनंद शर्मा यांनी ट्वीट करत मोदींच्या या दौऱ्याचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञांकडून सुरु असलेल्या कोरोना लस निर्मितीच्या कामाला मान्यता देणारा हा दौरा असल्याचंही आनंद शर्मा म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानातून उडण्याऐवजी शेतकऱ्यांची चर्चा करायला हवी होती. कोरोना लस शास्त्रज्ञांकडून बनवली जाईल, शेतकरी देशाला खायला घालतील, तर पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते टीव्ही सांभाळतील’ अशा शब्दात सुरजेवाला यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केलीय.

पंतप्रधान मोदींचं मिशन कोरोना व्हॅक्सिन!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 नोव्हेंबर रोजी लस निर्मिती करणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थाना भेटी दिल्या. हैदराबाद आणि अहमदाबादनंतर त्यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट घेऊन कोरोना लसीच्या निर्मितीचा आढावा घेतला. तब्बल सव्वा तास पंतप्रधान मोदी सिरममध्ये होते. मोदी यांनी कॉन्फरन्स रुममध्ये जाऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. लस कधीपर्यंत तयार होईल? ही लस किती परिणामकारक असेल? दिवसाला किती लसींची निर्मिती होऊ शकते? अशा अनेक बाबींची त्यांनी यावेळी माहिती घेतल्याचं पुनावाला यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी संशोधकांच्या कामाची स्तुती करत त्यांना प्रोत्साहन दिल्याचंही पुनावाला म्हणाले.

संबंधित बातम्या:

मिशन कोरोना व्हॅक्सीन! अहमदाबाद, हैदराबादनंतर पंतप्रधान मोदी सिरममध्ये; संशोधकांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान

Anand Sharma praises Modi, while Randeep Surjewala criticizes