नराधम मुकेशचा शेवटचा पर्यायही बंद, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

दया याचिकेसोबत खटल्यातील काही आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपतींकडे पाठवली गेली नाहीत, असा आरोप मुकेशने केला होता. याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी याचिका मुकेशने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

नराधम मुकेशचा शेवटचा पर्यायही बंद, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली

मुंबई : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र, राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळली (Nirbhaya convict writ petition rejected by Supreme Court). याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्याने आता त्याचा शेवटचा पर्यायही बंद झाला आहे. निर्भयाच्या मारेकऱ्यांना 1 फेब्रुवारीला फाशी होणार आहे.

दया याचिकेसोबत खटल्यातील काही आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपतींकडे पाठवली गेली नाहीत, असा आरोप मुकेशने केला होता. याप्रकरणी चौकशी व्हावी, अशी याचिका मुकेशने सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. मात्र, मुकेशच्या या याचिकेत काही तथ्य नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे आज (29 जानेवारी) सुप्रीम कोर्टाने मुकेशची याचिका फेटाळली (Nirbhaya convict writ petition rejected by Supreme Court).

जेलमध्ये आपले लैगिंक शोषण झाले आणि आपला भाऊ राम सिंहची हत्या करण्यात आली, असा आरोप मुकेशने बुधवारी कोर्टात केला होता. मात्र त्याच्या या आरोपातही तथ्य नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

“राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्याडे पाठवलेल्या दया याचिकेसोबत सर्व कागदपत्रे आम्ही पाहिली. गृहमंत्रालयाने सर्व कागदपत्रे पाठवली होती. मुकेशच्या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जेलमध्ये शोषण झाल्याच्या आरोपांमध्येही तथ्य नाही”, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने मुकेशची याचिका फेटाळली.

दोषींना 1 फेब्रुवारी फाशीची शिक्षा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोषींची दया याचिका फेटाळल्यानंतर कोर्टाने नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी केलं होतं. त्यामध्ये 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटकवण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर दोषी मुकेश सिंहने दया याचिकेसोबत आवश्यक कागदपत्रे राष्ट्रपतींकडे पाठवली नाहीत, असा दावा करत कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे येत्या 1 फेब्रुवारीला निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी होणार हे निश्चित झाले आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण काय आहे?

16 डिसेंबर 2012 च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. यावेळी घरी जाण्यासाठी ते एका बसमध्ये चढले. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्रानं त्यांना विरोध केला. मात्र आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *