मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 12 तासांचा होणार? नितीन गडकरी म्हणतात…

मुंबई ते दिल्ली हे अंतर 1200 किमीपेक्षाही जास्त आहे. मुंबई ते दिल्ली प्रवासाला आजच्या घडीला साधारणत: 24 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता प्रवासाचा हाच वेळ निम्मा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

मुंबई ते दिल्ली प्रवास फक्त 12 तासांचा होणार? नितीन गडकरी म्हणतात...

नवी दिल्ली : मुंबई ते दिल्ली हे अंतर 1200 किमीपेक्षाही जास्त आहे. मुंबई ते दिल्ली प्रवासाला आजच्या घडीला साधारणत: 24 तासांचा वेळ लागतो. मात्र, आता प्रवासाचा हाच वेळ निम्मा होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला आहे. मुंबई-दिल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर कारने मुंबई-दिल्ली प्रवासाला फक्त 12 तास लागतील, असे गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले आहेत.

मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासाठी 86 हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. केंद्र सरकारचे हा महामार्ग 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यास मुंबई-दिल्ली प्रवास फक्त 12 ते 13 तासांचा होणार आहे.

दिल्लीच्या डीएनडी ते मुंबई असे या महामार्गाचे बांधकाम सुरु आहे. मार्च 2019 पासून या महामार्गाचे बांधकाम सुरु झाले. या महामार्गाचे काम दोन भागात विभागले गेले आहे. पहिला भाग हा 844 किमीचा दिल्ली-बडोदा आणि दुसरा भाग 447 किमीचा बडोदा ते मुंबई असा आहे.

या महामार्गाच्या कामाबद्दल सांगताना नितीन गडकरी म्हणाले की, “मुंबई-दिल्ली महामार्ग हा देशाचा सर्वात लांब महामार्ग असणार आहे. या महामार्गासाठी लागणाऱ्या 90 टक्के जमिनीचे अधीग्रहण झाले आहे. महामार्गाचे बांधकाम वेगाने सुरु आहे. या महामार्गामुळे मुंबई ते दिल्ली दरम्यानचे 130 किमीचे अंतर कमी होईल.”

“मुंबई-दिल्ली नवा महामार्ग 2023 पासून सुरु होईल. हा महामार्ग सुरु झाल्यानंतर व्यापाराला चालना मिळेल. शहरांच्या बाहेरच्या बाजूने हा मार्ग असल्यामुळे प्रदुषणाची समस्या उद्भवणार नाही. महामार्गाच्या बाजूला दोन लाख झाडांची लागवड केली जाईल”, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.