मोदींवर टीका करताना चूक, ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या उत्तराने राहुल गांधींचा पचका

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:59 PM, 16 May 2019
मोदींवर टीका करताना चूक, ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या उत्तराने राहुल गांधींचा पचका

नवी दिल्ली : एक राजकीय नेता म्हणून प्रतिमा सुधारण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना गेल्या काही वर्षात यश आलंय. पण एका चुकीचाही या सर्व प्रयत्नांना कसा फटका बसतो ते एका उदाहरणातून समोर आलंय. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘स्मार्ट’ टीका केली होती. याचं कौतुकही झालं, पण ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या उत्तरानंतर राहुल गांधींचा डाव त्यांच्यावरच उलटला.

राहुल गांधींनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आणि इंग्रजी शब्दकोशात एका नव्या शब्दाचा समावेश झाल्याचं सांगितलं. याबाबतचा एक स्क्रीनशॉटही त्यांनी टाकला होता. या पोस्टमध्ये त्यांनी ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या वेबसाईटचं पेजही शेअर केलं होतं, ज्यात ‘मोदीलाई’ ( Modilie ) हा शब्द होता. या शब्दाचे तीन अर्थ देण्यात आले होते. सत्य सतत बदलणारा, सवयीनुसार सतत खोटं बोलणे आणि विचार न करताच खोटं बोलणे असे तीन अर्थ या शब्दाचे होत असल्याचं पोस्टमध्ये म्हटलं होतं.

राहुल गांधींनी पोस्ट शेअर केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्वीट मिळाले. शिवाय हजारोंच्या संख्येने कमेंटही आल्या. पण याच कमेंटमध्ये एक कमेंट अशी होती, ज्याने पोलखोल झाली. ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही कमेंट करण्यात आली होती. आम्ही प्रमाणित करतो की फोटोत दाखवलेल्या शब्दाची एंट्री बनावट आहे आणि ऑक्सफोर्डच्या कोणत्याही डिक्शनरीमध्ये हा फोटो नाही, अशी कमेंट खुद्द ऑक्सफोर्डनेच केली.