पी. चिदंबरम 106 दिवसांनी तिहार तुरुंगाबाहेर, 'या' चार अटींवर जामीन

सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला असला, तरी सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय पी चिदंबरम यांना देश सोडून जाता येणार नाही.

पी. चिदंबरम 106 दिवसांनी तिहार तुरुंगाबाहेर, 'या' चार अटींवर जामीन

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगवास झालेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यामुळे चिदंबरम (P Chidambaram Supreme Court Bail) तब्बल 106 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत.

पी. चिदंबरम गेले साडेतीन महिने म्हणजेच 106 दिवस तिहार तुरुंगात होते. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार 4 डिसेंबर) दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र जामीन देताना सुप्रीम कोर्टाने त्यांना काही अटी घातल्या आहेत.

कोर्टाच्या परवानगीशिवाय पी चिदंबरम यांना देश सोडून जाता येणार नाही. चिदंबरम यांनी पुराव्यांशी छेडछाड करु नये, साक्षीदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करु नये, या प्रकरणात माध्यमांना मुलाखती देऊ नयेत किंवा कोणतंही जाहीर वक्तव्य करु नये आणि सुप्रीम कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, या चार अटींवर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्थिक गुन्हे खूपच गंभीर असतात. मात्र, कायद्यात जामिनाची तरतूद आहे. जामिनाचा निर्णय खटल्यावर अवलंबून असतो, असं कोर्टाने चिदंबरम यांना जामीन देताना म्हटलं आहे.

याआधी, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) केसमधून पी चिदंबरम यांना 22 ऑक्टोबरला एक लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला होता. पण जामीन मंजूर झाल्यानंतरही चिदंबरम यांना जेलमध्ये (P Chidambaram Supreme Court Bail) राहावं लागलं होतं. कारण 24 ऑक्टोबरपर्यंत त्यांची रवानगी अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) कस्टडीमध्ये होती.

काय आहे प्रकरण?

आयएनएक्स मीडियाला FIPB- परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळाकडून बेकायदेशीर पद्धतीने परवानगी मिळवून देण्यासाठी पी चिदंबरम यांनी 305 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चिदंबरम यांना कोर्टाकडून आतापर्यंत जवळपास 25 वेळा अंतरिम जामीन मिळाला आहे. 2007 मध्ये चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना त्यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम यांना यापूर्वीच अटक केली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीने सरकारी साक्षीदार होण्यास होकार दिल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण मिळालं.

2017 मध्ये सीबीआयने परकीय गुंतवणूक प्रमोशन मंडळात आढळून आलेल्या बेकायदेशीर व्यवहार प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. तर ईडीने 2018 मध्ये पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आयएनएक्स मीडियाची मालकीण इंद्राणी मुखर्जीला साक्षीदार करण्यात आलं आणि जबाबही नोंदवण्यात आला. कार्ती चिदंबरम यांना 10 लाख रुपये दिल्याचं इंद्राणी मुखर्जीने कबूल केल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *