छत्तीसगड : काँग्रेसच्या अडगळीत पडलेल्या कार्यालयाला रंगरंगोटी सुरु

  • Sachin Patil
  • Published On - 12:28 PM, 11 Dec 2018
छत्तीसगड : काँग्रेसच्या अडगळीत पडलेल्या कार्यालयाला रंगरंगोटी सुरु

रायपूर : छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा 15 वर्षांचा वनवास संपलाय. विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताला आवश्यक असलेल्या जागांपेक्षा अधिक ठिकाणी आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. रायपूर येथील काँग्रेसच्या अडगळीत पडलेल्या कार्यालयाला रंगरंगोटी सुरू झाली आहे. गेल्या 15 वर्षांपासून काँग्रेस सत्तेत नसल्याने या कार्यालयाला अवकळा आली होती.

छत्तीसगडचं मुख्यमंत्रीपद सलग 15 वर्षे भूषवलेल्या उमेदवारावर पिछाडीची वेळ आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही चिंतेचं वातावरण आहे. यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली आहे.

90 विधानसभा सदस्यसंख्या असलेल्या छत्तीसगडमध्ये बहुमतासाठी 46 जागांची आवश्यकता आहे. भाजपला 25 जागांवरही आघाडी घेता आलेली नाही. तर काँग्रेसने 58 जागांची आघाडी घेतली आहे. रमण सिंह हे भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवारही आहेत.

छत्तीसगडसोबतच राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांचीही मतमोजणी होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्य भाजपच्या हातून गेल्यात जमा आहेत. काँग्रेसने राजस्थानमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे.