120 तासांनी बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत

फतेहवीर हा सुखविंदर सिंह यांचा एकुलता एक मुलगा होता. सुखविंदर सिंह यांचे लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी त्याचा जन्म झाला होता.

120 तासांनी बोअरवेलमधून बाहेर काढलेल्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत

चंदीगड (पंजाब) : संगरुर येथील भगवानपुरात 150 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला तब्बल 120 तासांनी बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेण्यात आल. मात्र, तिथे डॉक्टरांनी या चिमुकल्याला मृत घोषित केलं. 120 तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्याचा बोअरवेलमधून बाहेर आल्यानंतर काही तासाताच मृत्यू झाला. फतेहवीर असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे.

गुरुवारी 6 जूनला फतेहवीर 120 फूट खोल पडला होता. हा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडल्यापासूनच त्याच्या सुटकेसाठी पोलीस, एनडीआरएफचे जवानांनी अथक प्रयत्न करत होते. आज सकाळी फतेहवीरला बाहेर काढण्यात आलं. मात्र, त्याची प्रकृती प्रचंड चिंताजनक होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे डॉक्टर उपचार सुरु करण्याआधीच फतेहवीरने प्राण सोडले.

चिमुकला फतेहवीर बोअरवेलमध्ये कसा पडला?

संगरुरमधील भगवानपुरा गावात राहणारे सुखविंदर सिंह हे आपल्या कुटुंबासोबत गुरुवारी (6 जून) संध्याकाळी 7.30 च्या सुमारास शेतात काम करत होते. त्या दरम्यान दोन वर्षांचा फतेहवीर सिंह त्यांच्या शेजारीच खेळत होता. मात्र अचानक तो 10 वर्षांपासून बंद पडलेल्या बोअरवेलजवळ गेला. ही बोअरवेल प्लास्टिक आणि कचरा टाकून बंद करण्यात आली होती. मात्र त्या चिमुरड्याचा पाय त्या कचऱ्यावर पडला आणि अवघ्या क्षणार्धात तो बोअरवेलमध्ये जाऊन अडकला.

यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. फतेहवीरला वाचवण्यासाठी शर्थीचे अथक प्रयत्न सुरु झाले. सुरुवातीला तो ज्या बोअरवेलमध्ये अडकला आहे, त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा देण्यात आला. त्यानंतर त्याची बोअरवेलमधील स्थिती जाणून घेण्यासाठी कॅमेरा सोडण्यात आला.

फतेहवीर बोअरवेलमध्ये तब्बल 120 फुट खोलवर अडकला होता. त्याच्या दोन्ही हाताला सूज आली होती. बोअरवेलमध्ये असणाऱ्या कचऱ्याचा त्याला प्रचंड त्रास होत होता. या बोअरवेलची रुंदी 9 इंच असून खालील बाजूने ती 7 इंच रुंद आहे.

त्यानंतर बचाव यंत्रणांनी त्या बोअरवेलच्या समांतर असा 40 फुटाचा खड्डा खणला आणि या खड्ड्याद्वारे फतेहवीरला तब्बल 120  तासांनी बाहेर काढलं. त्यानंतर तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराआधीच फतेहवीरचा मृत्यू झाला.

फतेहवीर हा सुखविंदर सिंह यांचा एकुलता एक मुलगा होता. सुखविंदर सिंह यांचे लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी त्याचा जन्म झाला होता. काल 10 जूनला त्याला तीन वर्ष पूर्ण झाले होती. फतेहवीरच्या मृत्यूमुळे अवघ्या संगरुरवर शोककळा पसरली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *