17 व्या वर्षी LLB, गुन्हेगारांचे वकील ते कायदेमंत्री… ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचा प्रवास

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधे यांचे मारेकरी, स्टॉक मार्केट घोटाळ्याचे आरोपी हर्षद मेहता आणि केतन पारेख, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफझल गुरु, जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनू शर्मा यांची वकिलपत्रं घेतलेल्या राम जेठमलानी यांचं वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

17 व्या वर्षी LLB, गुन्हेगारांचे वकील ते कायदेमंत्री... ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी यांचा प्रवास
Follow us
| Updated on: Sep 08, 2019 | 10:39 AM

नवी दिल्ली : ‘गुन्हेगारांचे वकील’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ विधीज्ञ राम जेठमलानी (Ram Jethmalani) यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने वयाच्या 95 व्या वर्षी जेठमलानी यांचं निधन झालं. राजीव गांधी यांचे मारेकरी, अफझल गुरु, मनू शर्मा यांच्यापासून हर्षद मेहता, केतन पारेख यांच्यापर्यंत अनेक गुन्हेगारांचे खटले जेठमलानी यांनी लढवले आहेत. सुप्रीम कोर्टाचे ते सर्वाधिक मानधन घेणारे वकील होते.

राजधानी दिल्लीतील राहत्या घरी आज (रविवारी) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास राम जेठमलानी यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन आठवड्यांपासून जेठमलानी यांच्यावर उपचार सुरु होते, मात्र वयोमानापरत्वे त्यांची प्रकृती खालावत चालली होती.

वाढदिवसाला अवघे सहा दिवस बाकी असताना राम जेठमलानी यांचं निधन झालं. 14 सप्टेंबर रोजी त्यांनी वयाची 96 वर्ष पूर्ण केली असती.

सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंधमधील शिखरपूरमध्ये राम बूलचंद जेठमलानी यांचा जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी ते वकील झाले. शाळेत ‘डबल प्रमोशन’ मिळाल्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षी ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते. सतराव्या वर्षी त्यांनी ‘एलएलबी’ची पदवी मिळवली. ‘त्या काळात वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत वकिलीची परीक्षा पास होता येत नव्हती. मात्र आपल्याला अठराव्या वर्षी पदवी मिळाली’, हे राम जेठमलानी यांनी जवळपास वीस वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं. स्वातंत्र्योत्तर काळात ते मुंबईत दाखल झाले.

हायप्रोफाईल केसेसची जंत्री

राम जेठमलानी यांचं नाव 1959 मध्ये एका महत्त्वाच्या केसमुळे सर्वांसमोर आलं. केएम नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य ही ती केस. नानावटी केस त्या काळी प्रचंड गाजली होती. याच केसवर आधारित ‘रुस्तम’ हा चित्रपट अलिकडे प्रदर्शित झाला होता.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचा बचाव राम जेठमलानी यांनी केला होता. 2011 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची बाजू जेठमलानी यांनी मद्रास हायकोर्टात मांडली होती. स्टॉक मार्केट घोटाळ्याचे आरोपी हर्षद मेहता आणि केतन पारेख, अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, संसदेवरील हल्ल्याचा आरोपी अफझल गुरु, जेसिका लाल हत्याकांडातील आरोपी मनू शर्मा यांची वकिलपत्रंही जेठमलानी यांनी घेतली होती. अनधिकृत कोळसा घोटाळ्यात येडियुरप्पा, तर 2G घोटाळ्यात कनीमोळी यांची बाजूही त्यांनी मांडली होती.

हवाला घोटाळ्यात लालकृष्ण अडवाणी, सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणात अमित शाह यांची केसही त्यांनी लढवली होती. आमदार कृष्णा देसाई हत्या प्रकरणात शिवसेनेची बाजूही त्यांनी लढवली होती. सुब्रतो राय, लालू प्रसाद यादव, आसाराम बापू, जयललिता आणि अरविंद केजरीवाल यांच्या हायप्रोफाईल केसही त्यांनी लढवल्या आहेत.

राजकीय प्रवास

उल्हासनगरमधून राम जेठमलानी सर्वप्रथम अपक्ष लढले होते. शिवसेना-भाजपचा पाठिंबा असूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. सहाव्या आणि सातव्या लोकसभेत भाजपच्या तिकीटावर राम जेठमलानी मुंबईतून निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये जेठमलानी यांनी केंद्रीय कायदेमंत्री आणि नगरविकास ही मंत्रालयं सांभाळली होती.

2004 मध्ये खुद्द वाजपेयींविरोधातच त्यांनी लखनौमध्ये निवडणूक लढवली होती. 2010 मध्ये ते राजस्थानातून राज्यसभेवर नियुक्त झाले. 2012 मध्ये भाजपचे तत्कालीन अध्यक्ष नितीन गडकरी यांना पत्र लिहून सरकारवर घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर 2013 मध्ये जेठमलानी यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.

2010 मध्ये राम जेठमलानी हे सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. 10 सप्टेंबर 2017 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी निवृत्ती स्वीकारली होती.

वैयक्तिक आयुष्य

वयाच्या 18 व्या वर्षी राम जेठमलानी यांचं लग्न दुर्गा यांच्याशी झालं. तर 1947 मध्ये स्वातंत्र्यापूर्वी रत्ना शहानी या वकील महिलेशी त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांना दुर्गा यांच्यापासून राणी, शोभा आणि महेश ही तीन, तर रत्ना यांच्यापासून झनक अशी चार अपत्यं आहेत. मात्र दोन्ही पत्नी आणि चारही मुलं त्यांच्या कुटुंबाचा भाग आहेत. राणी यांचं निधन झालं असून शोभा यूएसमध्ये स्थायिक आहेत. तर महेश हे वकील म्हणून काम पाहतात.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.