पासवानांची रिक्त राज्यसभा जागा भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता, काय आहे गणित?

लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या मातोश्री रिना पासवान यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत आहे

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:30 PM, 24 Nov 2020

नवी दिल्ली : लोक जनशक्ति पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान (Ram Vilas Paswan) यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता बळावली आहे. लोजप उमेदवाराला जेडीयूकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी असल्याने भाजपचाच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाण्याची चिन्हं अधिक आहेत. 14 डिसेंबरला या जागेसाठी निवडणूक होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. पासवान यांच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होणार, की चुरस रंगणार, याची उत्सुकता आहे. (Ram Vilas Paswan’s vacant Rajya Sabha seat may go to BJP)

लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या मातोश्री रिना पासवान यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत होते. मात्र भाजपने स्पष्ट सूचना दिल्याशिवाय लोजप आपला कोणताही उमेदवार रिंगणात उतरवणार नाही, असे मानले जाते. भाजपही जेडीयूला दुखावून लोजप उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता कमी असल्याचं राजकीय जाणकार सांगतात.

बिहार विधानसभा निवडणुकीवेळी चिराग पासवान यांनी स्थानिक एनडीए आघाडीतून काढता पाय घेतला. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत त्यांनी नितीश कुमार आणि जेडीयूवर हल्लाबोल चढवला होता.

बिहार निवडणुकीच्या निकालात लोजपने जेडीयूला मोठा झटका दिला. चिराग पासवान यांनी भाजपविरोधात उमेदवार दिले नव्हते. मात्र जेडीयूविरोधात त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. निवडणुकीत लोजपला केवळ एकच जागा जिंकता आली असली, तरी त्यांच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्यामुळे जेडीयूचे अनेक उमेदवार पराभूत झाले.

भाजप बिहारमध्ये ‘बडे भैया’ झाला. एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजपचा वरचष्मा आहे. हा खरं तर लोजपचा करिष्मा मानला जातो. लोजपला भाजपची ‘बी टीम’ म्हणूनही हिणवलं जातं, मात्र दोन्ही पक्षांनी हे आरोप खोडून काढले आहेत. दुसरीकडे, बिहारचं मुख्यमंत्रिपद नितीशकुमारांकडे असले, तरी भाजपने दोन उपमुख्यमंत्री देत नव्या नेतृत्वाला आकार देण्यास सुरुवात केली आहे.

भाजपकडून कोणाला तिकीट मिळण्याची शक्यता?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद शहनवाज हुसेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, राज्यसभा सदस्य आर के सिन्हा यांचे पुत्र ऋतुराज सिन्हा यांची नावं शर्यतीत आहेत. 243 संख्याबळ असलेल्या राज्यसभेत एनडीएच्या उमेदवाराला किमान 122 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. लोजप वगळता एनडीएकडे 125 सदस्यांचे पाठबळ आहे. (Ram Vilas Paswan’s vacant Rajya Sabha seat may go to BJP)

रामविलास पासवान यांचे राज्यसभा सदस्यत्व 2 एप्रिल 2024 पर्यंत होते. त्यांच्या जागी निवडून येणाऱ्या खासदाराला साडेतीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

राम विलास पासवान यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत स्वतःची हाजीपूरची जागा धाकटे बंधू पशुपती कुमार पारस यांना दिली होती. त्यानंतर ते राज्यसभेवरुन संसदेत गेले. भाजपचे रवी शंकर प्रसाद लोकसभेवर निवडून गेल्यानंतर रिक्त झालेली जागा भाजपने मित्रपक्ष लोजपला दिली होती. मोदी सरकारमध्ये पासवान यांना अन्न आणि नागरी पुरवठा कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

राम विलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्याआधी ते आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

संबंधित बातम्या :

राम विलास पासवानांच्या रिक्त राज्यसभा जागेसाठी पोटनिवडणूक, रिंगणात कोण उतरणार?

नितीशकुमारांचं नंबर वनचं स्वप्न भंगलं; चिराग पासवान ठरले ‘जाएंट किलर’!

(Ram Vilas Paswan’s vacant Rajya Sabha seat may go to BJP)