पुलवामात पुनरावृत्ती टळली, तब्बल 20 किलो आयईडी भरलेली कार निकामी, सुरक्षा यंत्रणेला मोठं यश

दहशतवाद्यांचा पुलवामात पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्याचा बेत होता. मात्र, दहशतवाद्यांचा हा कट सुरक्षादलांनी उधळून लावला (Pulwama terror attack).

पुलवामात पुनरावृत्ती टळली, तब्बल 20 किलो आयईडी भरलेली कार निकामी, सुरक्षा यंत्रणेला मोठं यश

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या पथकाने (Pulwama terror attack) दहशतवाद्यांचा मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळून लावला आहे. पोलिसांना शोध मोहिमेदरम्यान 20 किलो आयईडी स्फोटकांनी भरलेली कार सापडली. या गाडीचा चालक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळून गेला. मात्र, गाडीतील स्फोटकाला निकामी करण्यात पोलिसांना यश आलं (Pulwama terror attack).

जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. “दहशतवाद्यांचा सुरक्षादलांवर मोठा हल्ला घडवून आणण्याचा बेत होता. मात्र, हा बेत सुरक्षादलांनी उधळून लावला आहे”, असं विजय कुमार यांनी सांगितलं.

“गेल्या आठवड्यातच गुप्तचर यंत्रणेकडून माहिती मिळाली होती की, जैश-ए-मोहम्मद आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटना एकत्र मिळून मोठा घातपात घडवण्याच्या बेतात आहेत. त्यानंतर आम्ही सतर्क झालो होतो. सुरक्षादलांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली होती”, असं विजय कुमार यांनी सांगितलं.

“शोध मोहिमेदरम्यान काल (27 मे) संध्याकाळी एका नाक्यावर आयईडी स्फोटकांनी भरलेली सेन्ट्रो कार आली. नाकाबंदी असताना ही कार सर्व बॅरिकेट्स तोडून भरधाव वेगाने पुढे गेली. आम्ही वॉर्निंग फायरिंग केली, मात्र अतिरेक्यांनी गाडी थांबवली नाही”, असं विजय कुमार म्हणाले.

“पुढच्या नाक्यावर पोलीस आणि जवानांनी त्या गाडीवर फायरिंग केली. मात्र, तिथे अंधार असल्यामुळे त्याचा फायदा घेत गाडी चालक गाडी सोडून पळून गेला. त्यानंतर आम्ही गाडी जप्त केली. गाडीची चेकिंग केली तेव्हा गाडीत मोठ्या प्रमाणात आयईडी स्फोटकं असल्याचं लक्षात आलं. ही गाडी एका निर्जन जागी नेऊन सर्व स्फोटकं निकामी करण्यात आले”, अशी माहिती विजय कुमार यांनी दिली.

पुलवामा जिल्ह्यात याआधी 14 फेब्रुवारी 2019 रोजी दहशतवाद्यांनी मोठा आत्मघातकी हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचे 45 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पुलवामात तसाच कट रचला होता. मात्र, हा कट पोलीस, लष्कर आणि सीआरफीच्या जवानांनी उधळून लावला आहे.

संबंधित बातमी :

Pulwama Attack : आयईडी ब्लास्ट काय असतो?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *