काँग्रेसच नव्हे, जम्मूतून भाजपच्या दिग्गजांनाही परत पाठवलं होतं तेव्हा...

जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही नेत्यांना (BJP Leaders) येऊ दिलं जात नाही आणि कुणी गेल्यास त्यांना विमानतळाहूनच दिल्लीला परत पाठवलं जात होतं. भाजपच्या या तीन दिवंगत नेत्यांसोबतही 24 जानेवारी 2011 रोजी असंच झालं होतं.

काँग्रेसच नव्हे, जम्मूतून भाजपच्या दिग्गजांनाही परत पाठवलं होतं तेव्हा...

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातले तीन दिग्गज नेते माजी मंत्री अनंत कुमार, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली (BJP Leaders) सध्या हयात नाहीत. पण विरोधी पक्षात असताना अत्यंत आक्रमक असणाऱ्या या नेत्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. जम्मू काश्मीरमध्ये सध्या कोणत्याही नेत्यांना (BJP Leaders) येऊ दिलं जात नाही आणि कुणी गेल्यास त्यांना विमानतळाहूनच दिल्लीला परत पाठवलं जात होतं. भाजपच्या या तीन दिवंगत नेत्यांसोबतही 24 जानेवारी 2011 रोजी असंच झालं होतं.

प्रजासत्ताक दिनापूर्वी भाजपच्या युवा मोर्चाने आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेसाठी सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि अनंत कुमार जम्मूमध्ये गेले होते. पण कलम 144 लागू केलेलं असल्यामुळे कोणत्याही कार्यक्रमासाठी बंदी होती. यातच हे तीन नेते चार्टर्ड विमानाने जम्मू विमानतळावर दाखल झाले. पण या तिघांना पुढे जाण्यास बंदी घालण्यात आली, ज्यानंतर तिघांनीही धरणं देण्याचा निर्णय घेतला.

डेक्कन हेराल्डने 24 जानेवारी 2011 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी अरुण जेटली यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. पण भाजपच्या या तीनही नेत्यांनी परत जाण्यास नकार दिला. यानंतर जम्मू काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी विमानतळावर तत्कालीन पोलीस महासंचालक कुलदीप खोडा आणि राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं. या अधिकाऱ्यांनी भाजप नेत्यांना विमानतळाच्या लाँजमध्ये बसण्याची विनंती केली, पण पुढे जाऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लाल चौकात भाजपकडून तिरंगा फडकवला जाणार होता. पण केंद्र आणि राज्य सरकारने यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला. भाजपच्या तीनही नेत्यांना कारमध्ये बसवण्यात आलं आणि पंजाबला रवाना केलं. यानंतर सुषमा स्वराज यांनी केंद्र सरकारचा जोरदार समाचार घेतला होता.

पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं होतं. “आम्ही जम्मू विमानतळावर उतरलो आणि विमानतळाचे सर्व गेट बंद करण्यात आले. आम्हाला बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्हाला त्यांनी कलम 144 अंतर्गत नोटीस दिली असून परत जाण्यासाठी जबरदस्ती करत आहेत. सुरुवातीला तर त्यांनी आम्हाला विमानातून उतरण्यासाठीच मनाई केली. आम्ही आता बाहेर आलो आहेत. पोलीस महासंचालकही आले आणि आम्हाला कैदेत ठेवलं असल्याचं त्यांनी सांगितलं, असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं होतं.

दरम्यान, कलम 144 हे फक्त जमावबंदीसाठी असून आमच्याविरोधात हे कलम वापरलं जाऊ शकत नाही, असं त्यावेळी जेटलींनी स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याशी बोलून पोलिसांच्या कारवाईबाबत तीव्र शब्दात निषेध केला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *