आसामची निवडणूक फिरतेय परफ्यूमवाल्याभोवती !

AIUDF ला शत्रू नंबर एक ठरवून आपला प्रचार तीव्र केलाय आणि काँग्रेस आमच्या खिजगणतीतही नाही असा मेसेजही दिलाय.

  • गजानन कदम, कार्यकारी संपादक, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 16:35 PM, 12 Mar 2021
आसामची निवडणूक फिरतेय परफ्यूमवाल्याभोवती !

सध्या आसामची निवडणूक कुणाकुणात लढली जातेय म्हंटलं की कुणीही भाजप विरुद्ध काँग्रेस असंच उत्तर देईल. हे वास्तव असलं तरी ते संपूर्ण नाही. कारण सत्ताधारी भाजपनं शत्रू नंबर वन म्हणून काँग्रेस नव्हे तर ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंट या पक्षाला निवडलंय. हा पक्ष आहे खासदार बद्रुद्दीन अजमल यांचा..आसाममध्ये NRC आणि CAA ला कडाडून विरोध करणारा हा पक्ष आहे. आसाममधले बंगाली भाषा बोलणारे मुस्लिम ही या AIUDF ची व्होट बँक. लोअर आसाम आणि बराक व्हॅली या भागात त्यांचे प्राबल्य आहे. सत्ताधारी भाजपनं आपली हिंदुत्वाची धार तीव्र करण्यासाठी या मुस्लिमधार्जिण्या AIUDF ला लक्ष्य करायचं ठरवलंय. त्यातून त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारलेयत. AIUDF ला शत्रू नंबर एक ठरवून आपला प्रचार तीव्र केलाय आणि काँग्रेस आमच्या खिजगणतीतही नाही असा मेसेजही दिलाय.

बद्रुद्दीन अजमल यांनी 2005 साली म्हणजे 16 वर्षांपूर्वी AIUDF ची स्थापन केली. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं ‘बेकायदेशीर स्थलांतरीतां’ संबंधीचा कायदा रद्द ठरवला होता. ही संधी साधून अजमल यांनी राजकारणात उडी घेतली. पुढे एकाच वर्षात म्हणजे 2006 च्या निवडणुकीत अजमल यांनी AIUDF चे 10 आमदार निवडून आणले. अजमल यांचे मुस्लिमांसाठी विविध ट्रस्ट आणि संघटनांच्या मार्फत आधीच काम सुरु होते, त्याचा निवडणुकीत फायदा झाला. 2011 च्या निवडणुकीत तर AIUDF ने कमाल केली. 140 पैकी 18 जागांवर विजय मिळवत आसाम गण परिषदेचे नंबर 2 चे स्थान पटकावले. 2016 च्या आसाम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजपनं 140 पैकी 60 जागा जिंकत पहिल्यांदा आसामवर कब्जा केला. भाजपच्या या लाटेत अजमल यांचा स्वतःचा पराभव झाला पण त्यांच्या AIUDF ला 14 जागा मिळाल्या. 2011 च्या तुलनेत 4 जागांची घट झाली तरी पक्षाची वोट बँक फिक्स आहे यावर शिक्कामोर्तब झाले. दुसरीकडे सत्ताधारी काँग्रेसची 78 वरुन 19 पर्यंत घसरण झाली. काँग्रेसची ही घसरण AIUDF ची ताकद सांगते. भाजपकडून नेहमीच लक्ष्य होत असल्यामुळंही AIUDF ला पक्षविस्तार करण्यात आणि वोट बँक निश्चित करण्यात मदतच झालीय.

काँग्रेसनं सध्या AIUDF सोबत निवडणूकपूर्व आघाडी केलीय. त्यावरुन आनंद शर्मांसह काँग्रेसमधल्या अनेकांनी टीका केली. जातीयवादी पक्षाशी जवळीक केल्याचा आरोपही लावला. भाजपने तर मोठेच तोंडसुख घेतले. पण काँग्रेसनं जोखीम पत्करुन केवळ भाजपचा कट्टर विरोधक हा निकष लावून बद्रुद्दीन अजमल यांच्याशी युती केली. 2005 च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी कोण हा बद्रुद्दीन ? म्हणत खिल्ली उडवली होती. आज काँग्रेस त्यांच्याशी हातात हात मिळवून निवडणूक लढतेय. 140 पैकी 86 जागा काँग्रेस लढतेय आणि 21 जागा बद्रुद्दीन अजमल यांच्या AIUDF ला दिल्यात. महाजोटमधल्या इतर सहा पक्षांना 19 जागा देण्यात आल्यात. AIUDF नं काँग्रेसच्या 86 पैकी 5 जागांवर आपले उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढतीची घोषणा केलीय, तरी काँग्रेस गप्पच आहे.

2006 च्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजमल यांनी धुब्री या लोकसभा मतदारसंघातली निवडणूक जिंकले. त्यानंतर 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी आपला गड कायम ठेवला. 2019 मध्येही त्यांनी धुब्रीमधून विजय मिळवत हॅट्रीक साधली. 65 वर्षांच्या बद्रुद्दीन अजमल यांना सात अपत्ये आहेत. सध्याच्या लोकसभेत सर्वाधिक सात अपत्ये असणारे ते एकमेव खासदार आहेत. हाजी अब्दुल माजीद मेमोरियल ट्रस्टची त्यांनी स्थापना करुन करीमगंज जिल्ह्यात मुस्लिमांसाठी चॅरिटेबल हॉस्पिटल सुरु केलंय.

बद्रुद्दीन अजमल हे अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये करुन चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची मोडतोड करुन व्हिडीओ क्लिप वायरल केली गेलीय. वायरल क्लिपमध्ये अजमल हे “AIUDF आणि UPA सत्तेत आली तर सारा भारत इस्लाम देश होईल. एकही हिंदू भारतात राहणार नाही, सर्वांना धर्मांतर करावं लागेल” असं म्हणत असल्याचा दावा केला जातोय. मोगलांनी या देशावर 800 वर्षे राज्य केले, हा देश इस्लामीच होता असाही क्लिपद्वारे दावा केला गेलाय. पण प्रत्यक्षात फॅक्ट चेक करणाऱ्या वेबसाईट्सनी हे वक्तव्य असं नाही तर “मोगलांनी 800 वर्षे राज्य केले पण या देशाला इस्लामी देश बनवलं नाही, इंग्रजांनी 200 वर्षे राज्य केले, पण देश ख्रिश्चन बनवला नाही, दोन्ही शासकांनी ठरवलं असतं तर या देशात धर्मांतर झालं असतं” असं अजमल म्हणत असल्याची वस्तुस्थिती मांडलीय.

जानेवारीमध्येही अजमल यांचं एक वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं. ” भाजप 3500 मशिदी उद्ध्वस्त करणार आहे आणि मशिदींची यादीही त्यांच्याकडे आहे असं म्हणाले होते. भाजप सत्तेत आली तर ते मुस्लिम महिलांना बुरखा घालू देणार नाहीत, पुरुषांना दाढी वाढवू देणार नाहीत, मुस्लिमांना त्यांची टोपी घालू देणार नाहीत, इतकंच काय मशिदीतल्या अजानवरही ते बंदी आणतील” असं वक्तव्य अजमल यांनी केलं होतं. 22 जानेवारीच्या या त्यांच्या वक्तव्यांचा त्यावेळी काँग्रेसनंही धिक्कार केला होता, पण सध्या युती आहे.

बद्रुद्दीन अजमल यांचे वडील तांदळाचे उत्पादन करणारे शेतकरी होती. मुंबईत स्थायिक होण्यासाठी आले होते पण, परफ्युमच्या धंद्याशी ओळख झाली आणि आसामला परत जाऊन तोच व्यवसाय सुरु केला. बद्रुद्दीन अजमल यांनी या धंद्याचा विस्तार करुन 50 देशांमध्ये विशेषतः आखाती देशांमध्ये आपले ‘अजमल परफ्युम’ लोकप्रिय केले. ऊदापासून 300 विविध प्रकारचे परफ्युम ते बनवतात. 36 हून अधिक भारतीय शहरांत आणि 240 हून अधिक जागतिक शहरात अजमल परफ्युमचे आऊटलेट्स आहेत. परफ्युमचा त्यांचा हा धंदा अनधिकृत आकडेवारीनुसार 3 हजार कोटी रुपयांपर्यंतचा आहे.

जमियत उलेमा-ए-हिंद या राष्ट्रीय संघटनेचे ते आसामचे प्रदेशाध्यक्षही आहेत. त्यामुळं तर त्यांच्यावर जातीयवादाचा शिक्का गडद होतो. अजमल यांचा जगातल्या 500 प्रभावी मुस्लिमांमध्ये नेहमी समावेश होतो. दारुल उलूम देवबंद या विद्यापीठातून त्यांनी थिओलॉजीमध्ये एम ए केलंय. माझा पक्ष हिंदूविरोधी नाही. उलट माझे 30% उमेदवार हिंदू धर्मीय असतात, 2006 ला तर आमच्या 10 पैकी 2 आमदार हिंदू होते असं ते म्हणतात.

संबंधित बातम्या

Assam Assembly Election 2021 date : आसाम विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला, मतदान आणि निकाल कधी?

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

Assam Assembly Election 2021: Assam elections revolve around perfume person!