BLOG : बाळासाहेब थोरातांच्या राजकारणाची सात सत्तासूत्रं

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांची गौरवशाली परंपरा आहे. अशा नेत्यांच्या परंपरेतील एक महत्वाचा नेता म्हणून बाळासाहेब थोरातांचं स्थान तयार झालेलं आहे. थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा विशेष ब्लॉग

  • Updated On - 6:47 pm, Fri, 7 February 20 Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
BLOG : बाळासाहेब थोरातांच्या राजकारणाची सात सत्तासूत्रं

महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं नावचं विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील ते सर्वात सिनियर मंत्री आहेत. राज्यात सध्या राजकारणाचा आणि सत्ताकारणाचा प्रदीर्घ अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना सर्वात जास्त आहे. त्यांच्यानंतर नेत्यांची यादी करायची तर त्यात बाळासाहेब थोरात यांचं नाव अग्रभागी घ्यावं लागेल. गेली 40 वर्षे बाळासाहेब थोरात संसदीय राजकारणात आहे. एकाही निवडणुकीत त्यांचा कधी पराभव झालेला नाही. ते आठव्यांदा संगमनेरचे आमदार झाले. एका मतदारसंघाचं इतक्या प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करण्याचं रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे. महाराष्ट्र विधानसभेत शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख प्रदीर्घ काळ (50वर्ष) आमदार होते, पण त्यांना दोनदा पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. बाळासाहेब थोरात यांनी मात्र सलग आठव्यांदा आमदार होणं ही दुर्मिळ कर्तबगारी साधली आहे (Blog on Balasaheb Thorat).

या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचं लक्ष होत. राज्यात काँग्रेस पक्ष अडचणीत होता. अनेक नेते पक्ष सोडून पळाले. काही अजूनही पळण्याच्या तयारीत आहेत. अशा काळात कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खच्ची होतं. तसं काँग्रेस कार्यकर्त्यांचं मन डगमगलं. सत्ता नसली की साधनांची कमी असते. त्यात मीडिया विरोधात होता. न्यूज चॅनल आणि प्रिंट मीडियात काँग्रेस बुडणार, संपणार, काँग्रेसकडे नेता नाही, अशी शेरेबाजी केली जात होती. बाळासाहेब थोरात काय करणार? अशा शंका घेतल्या जात होत्या. अशा विपरित परिस्थितीत थोरात यांनी काँग्रेसचा किल्ला जोरात लढवला. काँग्रेस पक्षाचे त्यांच्या नेतृत्वात 44 आमदार निवडून आले. त्यामुळे महाआघाडीच्या नव्या सत्ता समीकरणात काँग्रेस पक्षाला महत्वाचं स्थान मिळालं. अडचणीत काँग्रेस पक्षाला ‘लकी’ ठरलेला नेता असंही राज्यात बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचं कौतुक झालं.

एका अर्थानं बाळासाहेबांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा उभारी दिली. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात असं काय वेगळं रसायन आहे? त्यांच्याकडे असं काय सूत्र आहे? थोरातांच्या नेतृत्वाचा जवळून परिचय करुन घेतला,अभ्यास केला तर त्यांच्या नेतृत्वाची 7 सूत्रं दिसतात. ती अशी –

1. राजकारणाचा गांधीयन पॅटर्न

बाळासाहेब थोरात यांचे वडील सहकारमहर्षी भाऊसाहेब विद्यार्थी दशेत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात असत. तिथं त्यांना महात्मा गांधी, नेहरू यांच्या कार्याचा परिचय झाला. देशभक्तीच्या वातावरणात भारावून जाऊन त्यांनी स्वातंत्र चळवळीत उडी घेतली. स्वातंत्र आंदोलनातले त्यांचे काही सहकारी कम्युनिस्ट विचारांचे होते. त्यामुळे समाजवादी, कम्युनिस्ट विचारांचा संस्कार त्यांच्यावर होणं स्वाभाविक होत. पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकरी चळवळ आणि सहकारी चळवळीत काम करताना शेवटच्या माणसासाठी राजकारण ,सत्ताकारण करणं हे भाऊसाहेब थोरातांच्या कार्यशैलीचा भाग राहिला. गांधीजी म्हणत तसे शेवटच्या माणसाच्या विकासासाठी काम करत राहणं ही विचारांची शिदोरी वडिलांकडून बाळासाहेब थोरात यांनी पुढे चालवली, वाढवली. शेवटच्या माणसांना केंद्रस्थानी ठेवून, त्याला बरोबर घेऊन राजकारण करण्याच्या शैलीमुळे त्यांचं राजकारण, सत्ताकारण लोककेंद्री राहिलं. संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संस्थांच्या प्रगतीचा आलेख बघितला तर आपल्या हे सहज लक्षात येत. थोरातांच्या राजकारणाची दिशा लोककेंद्री असल्याने साहजिकच त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत आला आहे.

2. संयमी , समन्वयी नेतृत्व

बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाची शैली संयमी आणि समन्वयाची आहे. संगमनेरात गमतीने असं म्हणतात की थोरातांच्या राजकारणाचा कुणी विरोधकच नाही. संगमनेरात विरोधी पक्षच नाही. एकच पक्ष आहे तो म्हणजे थोरातांचा. थोरात हे निवडून आले की सर्वांचे आमदार होतात. सर्वांना जवळ घेतात. कुणी परका कुणी आपला असं राजकारण ते करत नाहीत. सत्ताधारी अनेकदा विरोधकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांना एकटं पाडून नेस्तनाबूत करतात. बाळासाहेब थोरात सर्वांशी संयमाने वागतात. समन्वय घडवून आपले परके असा भेद मिटवून टाकतात. त्यामुळे त्यांचे एकेकाळचे विरोधक विरोध विसरुन त्यांचं नेतृत्व मान्य करुन विकासाचं राजकारण स्वीकारतात.

3. सत्तावाटपाचा संगमनेर फॉर्म्युला

बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सर्व जाती गटांना सत्तेत वाटा मिळवून दिलाय. संगमनेर तालुक्यात धनगर, वंजारी, माळी, मुस्लिम या समूह गटांना त्यांनी साखर कारखाना, दूध संघ, शेतकी संघ अशा संस्थांमध्ये सत्तेत वाटा दिला. पंचायत समिती, जिल्हा परिषद, संगमनेर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बाळासाहेब थोरात यांनी विविध जाती गटांना प्रतिनिधित्व दिलेलं दिसतं. संगमनेर तालुक्यात धनगर समाजातील बाजीराव खेमनर हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. संगमनेर नगरपालिकेत शिंपी, कासार, माळी आणि इतर छोट्या अलुतेदार, बलुतेदार जातींचे नगरसेवक झालेले दिसतात. सत्तेचं असं वाटप झालेलं असल्यानं वंचितांना बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचा आधार वाटला नाही तरच नवल. सत्तेचं केंद्रीकरण होणार नाही. याचा त्यांनी जाणीवपूर्वक विचार केलेला दिसतो. त्यामुळे सर्वजातीधर्माचे लोक त्यांच्यासोबत आहेत. या एकीच्या बळावर ते आठवेळा विधानसभा जिंकत इतिहास घडवत आलेत.

4. थेट मतदारांशी नाळ

असं म्हणतात की माणसाची पारख तो नशेत असताना होते. मग ती नशा सत्तेची , प्रसिद्धीची, व्यसनाची किंवा रुपाची अशी कशाचीही असू शकते. सत्तेची नशा तर अनेकांना चढते. त्या नशेत माणसं कसे वागतात, किती अहंकारी बनतात हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. बाळासाहेब थोरात अत्यंत कमी वयात आमदार झाले. पंधरा वर्षं मंत्री पद, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता उद्धव ठाकरे अशा पाच मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय. एवढी प्रदिर्घकाळ सत्ता जवळ असूनही ते मतदार संघातल्या सामान्य माणसाच्या घरी जाऊ शकतात. मतदार संघात कुणाचा अपघात झाला,कुणाचा मृत्यू झाला तर ते घरी जातात. सांत्वन करतात. सत्तेची नशा त्यांना कधी बाधत नाही हा संगमनेरकरांचा अनुभव आहे. त्यामुळेच बाळासाहेबांना कधी लोकांकडे मतं मागावी लागत नाही. लोक त्यांना भरभरून मतदान करतात.

5. अंतर्बाह्य ‘काँग्रेसमन’

लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेते राहुल गांधी प्रचारासाठी संगमनेरात आले तेव्हा परतताना त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या बरोबर फोटो काढला तो गाजला. त्या फोटोत राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील केमिस्ट्री दिसली. ही केमिस्ट्री विचारातील आहे. बाळासाहेब हे अंतर्बाह्य काँग्रेसमन आहेत. ते पक्के लोकशाही जीवनशैली अंगी मुरलेले राहुल गांधी यांच्यासारखेच मवाळ नेते आहेत. काँग्रेस विचारातील धर्मनिरपेक्षता हा त्यांच्या जगण्यातला महत्वाचा भाग आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालत राजकारण करणे हा त्यांचा स्वभाव आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी बरोबर वाटाघाटी करताना त्यांचा हा सर्वसमावेशक स्वभाव दिसला.

6. प्रयोगशील राजहंस नेता

सहकारी चळवळीत प्रयोगशील नसलेले नेते संपून गेले. महाराष्ट्रात अशा संपलेल्या नेत्यांची अनेक उदाहरणे आहेत. ज्या नेत्यांनी नवे प्रयोग केले सहकारी संस्था नव्या काळाची आव्हाने ओळखून चालवली तेच नेते टिकले. अशा नेत्यांपैकी बाळासाहेब थोरात हे एक सन्माननीय नाव म्हणता येईल. संगमनेर सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ आणि इतर संस्था त्यांनी नव्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन पुढे नेल्या म्हणून त्या टिकल्या, वाढल्या. संगमनेरच्या विकासात, काया पालट करण्यात या संस्थांचा सिंहाचा वाटा आहे. संगमनेरच्या दूध संघाचं नाव राजहंस आहे. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचं वर्णन राजहंस असं केलं तर ते अगदी योग्य ठरेल. राजहंसाजवळ दूध आणि पाणी वेगळं करण्याची क्षमता असते. हे रुपक बाळासाहेब थोरात यांच्या बाबतीत सांगता येतं.

7. सर्वांना सावली देणारं झाड

काही झाडं उंच वाढतात पण ती वाटसरुंना सावली देत नाहीत. अशोकाची झाडं अशीच सावली न देणारी असतात. या झाडांचा कुणालाही उपयोग होत नाही. याउलट वडाच्या झाडासारखी झाडं उंच वाढत नाहीत, पण ती डेरेदार होतात. सर्वांना सावली देतात. बाळासाहेब थोरात यांना संगमनेरकर सर्वांना सावली देणारं वडाचं झाड म्हणतात. कार्यकर्त्यांना आणि इतरही कुणालाही. म्हणूनच संगमनेरकर बाळासाहेबांना लोकनेता, महानेता असं म्हणतात. दुष्काळ असो की महापूर अशा विपरीत परिस्थितीत टिकून राहणारा वटवृक्ष असतो. तसं बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्ये आहे.

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांची गौरवशाली परंपरा आहे. अशा नेत्यांच्या परंपरेतील एक महत्वाचा नेता म्हणून बाळासाहेब थोरातांचं स्थान तयार झालेलं आहे.

आज 7 फेब्रुवारी 2020. त्यांचा वाढदिवस. संगमनेरकर तो मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमाने साजरा करतात. ख्यातनाम संगीतकार, गायक अवधूत गुप्ते यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात गाणं लिहिलं होतं, संगमनेरात घराघरात, बाळासाहेब थोरात, लई जोरात. हे नुसतं शब्द नाहीत, तर संगमनेरकरांचा अनुभव आहे. बाळासाहेब थोरातांनी राज्याचं नेतृत्व करावं, राज्याचं मुख्यमंत्री व्हावं अशी संगमनेरकरांची इच्छा आहे. संगमनेरकरांची एक आवडती म्हण आहे, सौ शहरी, एक संगमनेरी.

बाळासाहेब थोरात यांच्यापुढे अर्थात आव्हानेही खूप आहेत. काँग्रेस पक्ष एकेकाळी महाराष्ट्रातला प्रमुख सत्ताधारी पक्ष होता. आज राज्यात तो चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. महाविकास आघाडीत तो तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सामान्य काँगेस जणांना हे शल्य आल्यास वावगं काही नाही. आजच्या काँग्रेस पक्षाला पुन्हा जुने दिवस पहायचे असतील तर बाळासाहेब थोरात यांचं नेतृत्व या अवस्थेतल्या काँग्रेसला कसं पुढे घेऊन जाणार? अशा अवस्थेतल्या राजकीय पार्टीला पुढे घेऊन जायला आक्रमकता लागेल. बाळासाहेब थोरात असे आक्रमक होतील काय? की त्यांचा संयमी स्वभाव इथं त्यांना अडचणींचा ठरेल? हे येत्या काळात पाहायला मिळेल.

काँग्रेस पक्ष वाढवायचा तर राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वेगळी रणनीती आखावी लागेल. ती आखण्यासाठी काँग्रेसला पुन्हा जुन्या अजेंड्याकडे ताकदीनिशी जावं लागेल. काँग्रेसला बहुजनांचा पक्ष व्हावं लागेल. बहुजन छोट्या मोठ्या जाती बरोबर कशा घ्यायच्या, त्यांना सत्तेत वाटा कसा द्यायचा? याचा होमवर्क बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात, अहमदनगर जिल्ह्यात यशस्वीपणे केलाय. त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी राज्यपातळीवर करायची तर इतर काँग्रेस नेत्यांच्या गळी हा कार्यक्रम उतरावा लागेल. काँग्रेसचे अनेक नेते अजुनही सरंजामी मानसिकतेतून बाहेर आलेले नाहीत. त्यासाठी सरंजामी काँग्रेसजनांना दुखवण्याची तयारी करावी लागेल. अशी तयारी बाळासाहेब थोरात करतील काय?

बाळासाहेब थोरात यांना यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखा इतिहास घडवण्याची संधी आहे. मात्र, हा इतिहास घडवायचा तर त्यांना त्यांच्यातल्या चांगुलपणाला आवर घालावी लागेल. राजकारणात डावपेचाचंही एक महत्व असते. अर्थात बाळासाहेबांना या सर्व राजकीय आव्हानांची उत्तम जाण आहे. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या स्पर्धेत काँग्रेसला जुने दिवस आणून देण्यासाठी काय काय करायचं यासाठी ते तयार असतीलच! वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा

(Blog on Balasaheb Thorat) !

टीप : लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.