पार्था, तुझं नक्की काम तरी काय?

पार्था, तुझं नक्की काम तरी काय?

– ब्रम्हा चट्टे खरंतर पार्थ पवार आणि त्यांचे पहिलेच भाषण यावर मला खरंच काय भाष्य करायचं नव्हतं. त्यामुळे मी गेले तीन चार दिवस काही भाष्य केले नाही. कारण भाषण येणे हे काय कर्तुत्वाचा मापदंड नाही असे मी समजतो. आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात करताना पार्थ पवार यांनी “आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर […]

सचिन पाटील

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

– ब्रम्हा चट्टे

खरंतर पार्थ पवार आणि त्यांचे पहिलेच भाषण यावर मला खरंच काय भाष्य करायचं नव्हतं. त्यामुळे मी गेले तीन चार दिवस काही भाष्य केले नाही. कारण भाषण येणे हे काय कर्तुत्वाचा मापदंड नाही असे मी समजतो.

आपल्या पहिल्याच भाषणाची सुरुवात करताना पार्थ पवार यांनी “आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, असं आर्जव केलं होतं. त्यांनतर जवळपास अडीच मिनिटांचं हे भाषण पार्थ पवारांनी केलं.

पार्थ म्हणाले होते, ” आज माझं पहिलं भाषण आहे, ते पण साहेब आणि दादांसमोर… त्यामुळे काही चुकामुका झाल्या तर सांभाळून घ्या. आपला देश कुठे चाललाय हे आपल्या सर्वांना दिसतंय. बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम्स या सरकारने आपल्यासमोर ठेवलेले आहेत. या सरकारने भारत.. भारताला कठीण पोजिशनमध्ये ठेवलंय, अडचणीत आणलंय.. आपलं जेव्हा सरकार होतं, यूपीए सरकारने जेवढे पण कामं केलं, जेवढे पण विकास केले, या सरकारांनी तशे काहीच केले नाही. हे फक्त बीजेपी सरकार आहे, फक्त स्वप्न दाखवणारं आहे, असा आरोप करत पार्थ पवार यांनी आपल्या छोट्याखाणी भाषणाचा समारोप केला होता.

भाषण करताना पार्थ पवार घाबरले होते यात काहीच शंका नाही. अगदी जुजबी भाषण करून त्यांनी शांत राहणं पसंत केलं. भाषण करता येत नाही हा तसा टीकेचा विषय होत नाही. भाषण हे कर्तव्याचे मापदंडही नाही. “बडे बडे बाता * खाये लाता” अशा सगळीकडे गत असते. गेल्या पाच वर्षात आपण बघितलेच भाषण करणाऱ्यांनी काय काय दिवे लावले आहेत. पण आज पार्थ पवार यांची प्रतिक्रीया बघून थोडसं लिहावं वाटलं. पार्थ पवार आज म्हणाले, ” एक-दोन चुका झाल्या. याचा असा अर्थ नाही की त्यावरच लक्ष केंद्रीत करायला हवं. काही लोक भाषण करतात आणि काम करत नाहीत. माझी वेगळी पद्धत आहे. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो”

तर मला खरंच माहित नाही पार्थ पवार यांचं काम काय आहे? म्हणजे ते एखाद्या शिक्षण संस्थेचे संचालक असतील किंवा साखर कारखान्याचे संचालक असतील किंवा फारतर एखादी सामाजिक संस्था सुरू केली असेल त्या माध्यमातून ते जनतेचे काम करत असतील असं मला वाटलं. मी खूप जणांना विचारलं की पार्थ पवार यांचं काम काय आहे? बारामतीतल्या लोकांना माहिती असेल पण ते मला माहिती नाही. जर त्यांचे कोणी कार्यकर्ते असतील त्यांचे समर्थक असतील तर त्यांनी यावर प्रकाश टाकावा.

पवार कुटुंबीयांची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे हे मान्यच आहे. पवारसाहेबांचे नातू रोहित पवार यांना प्रत्यक्ष भेटलेलो आहे. त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे. त्यांच्या कामाचा आवाकाही मला माहिती आहे. आणि त्यांच्या कामाची पद्धती मला माहिती आहे.

कृषी क्षेत्रात ज्या पद्धतीने रोहित पवारांनी स्वतःला झोकून दिले आहे ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. रोहित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या गावागावात जाऊन तिथल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना विशेष म्हणजे पवार साहेबांच्या उमेदीच्या काळातील कार्यकर्त्यांना भेटून त्यांच्याकडून साहेबांबद्दलची माहिती गोळा केली आहे. त्यांचे अनुभव समजून घेतले आहेत.

पण पार्थ पवार आत्ता आत्ता मागच्या दोन तीन महिन्यापासून सक्रिय झालेले दिसले. त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे हे जरा मला माहिती नाही. माध्यमांनीही त्यांच्यावर विशेष लक्ष दिलेलं दिसत नाही. म्हणजे अजित पवार यांचे कार्य किंवा शरद पवार यांचे कार्य या कार्याच्या जोरावर पार्थ पवार असे म्हणत असतील की माझ्या कार्य बघा तर मग मात्र कुठं तरी चुकतंय.

पार्थ पवार हे लोकसभेमध्ये मावळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. अर्थात त्यांना सभागृहात मतदारसंघाचे प्रश्न मांडावे लागतील.  त्याचबरोबर देशासमोर, राज्यासमोर आलेले इतर प्रश्नांवरही चर्चेत सहभाग घ्यावा लागेल. त्यामुळे पार्थ पवार यांची तयारी कितपत आहे हे त्यांच्या पहिल्या भाषणात समजून आले आहे. तसेही पार्थ यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्यांच्या चुलत बंधू असलेले रोहित पवार यांनी त्यांना सल्ला दिला होता की, “पार्थने आता लोकांशी संवाद साधायला हवा, लोकांमध्ये जावे, त्यांचे काम करावे,” असा सल्ला भाऊ रोहितने पार्थला दिला आहेच.

मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा आहेत.  त्यापैकी तिन मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत हे विधानसभा मतदारसंघ आहेत. पुणे जिल्ह्यातील मावळ विधानसभाचे सदस्य हे भाजपचे संजय भेगडे, चिंचवड विधानसभाचे सदस्य हे लक्ष्मण जगताप तर पिंपरी विधानसभाचे सदस्य हे शिवसेनाचे ऍड. गौतम चाबुकस्वार आहेत.

रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभेचे सदस्य भाजपचे प्रशांत ठाकूर, उरण विधानसभेचे सदस्य शिवसेनेचे मनोहर भोईर तर कर्जत विधानसभा मतदारसंघाचे सदस्य सुरेश लाड हे राष्ट्रवादीचे आहेत. मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीचे एकहाती वर्चस्व आहे. केवळ कर्जत विधानसभा मतदारसंघातील सुरेश लाड यांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्वच पाची विधासभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत.

2009 पासून मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत होत आहे. तो मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नाही. त्यामुळे पार्थ पवारांना या जागेवर निवडून येणं तितकं सोप्प नाही. पण आपल्या आजोबा आणि वडिलांच्या कामाच्या जोरावर पार्थ पवारांची गाडी जोरात आहे. मात्र पार्थ पवार यांची आजची प्रतिक्रिया बघून असं वाटतंय गेली तीन-चार वर्षे पार्थ मावळ मतदारसंघात काम करतात. त्यांच्या कामाला बघून त्यांना उमेदवारी दिलेले आहे. घराणेशाहीच्या खांबांवर ज्या पक्षाचा वाडा उभा राहिला आहे. त्या पक्षात उमेदवारी देताना वडील आणि  काका आजोबा यांच्याच कर्तृत्वाचं मापदंड लावलं नसतं तर नवल होतं. पवार घराण्यात घराणेशाही हा प्रकार नाहीच आहे, असे सगळे एकंदर वाटते. त्यामुळे म्हणावंसं वाटतं, “पार्था, तुझं नक्की काम तरी काय आहे?”

(टीप – लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें