मग कसं बोलणार, आपलं सरकार कामगिरी दमदार?

मग कसं बोलणार, आपलं सरकार कामगिरी दमदार?

ब्रम्हा चट्टे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

महाराष्ट्र शासनाचा कारभार किती दमदार आणि किती गतीने सुरु आहे. याचं फक्त एक उदाहरण सांगतो. सामाजिक न्याय विभागाने ज्येष्ठ नागरिकांसाठी राणा भीमदेवी थाटात धोरण जाहीर केले. विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात दिनांक 11 जुलै 2018 रोजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी

सर्व योजनांच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा 65 वरून 60 वर्षे केली असल्याची गर्जना केली. या निर्णयाचे सर्वपक्षीय आमदारांनी बाक वाजवून दमदारपणे स्वागतही केलं. या निर्णयाची चोख अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश (म्हणजेच दम) दिले  असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी विधानसभेत दिली. यानंतर मंत्रीमहोदयांनी वारंवार  जिथे मिळेल तिथे याद निर्णयाचा उल्लेख करत आपली पाठ थोपटून घेतली.

आता या घोषणेनंतर तब्बल सहा महिन्यानंतरही एसटी महामंडळाला हा आदेश प्राप्त झाले नसल्याचे कंडक्टर सांगत आहेत. सरकारचा GR एसटी महामंडळाला अद्याप मिळाला नाही. त्यामुळे तिकीट दराच्या सवलतीसाठी एसटीत जुनीच वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे पेपर मध्ये वाचलेल्या बातम्या वाचून शासनाचे गुणगान गात साठी पार केलेले लोक एसटीत जातात खरी पण एसटीमध्ये काम करणाऱ्या बिचाऱ्या कंडक्टर लोकांना आदेश नसल्याने अर्ध्या तिकिटावरून  प्रवासी व कंडक्टर यांच्यात वादावादी होत आहेत.

महाराष्ट्र शासन एसटीच्या माध्यमातून समाजातील 24 दुर्बल घटकांना 30 टक्के पासून 100 टक्के पर्यंत तिकिट भाड्यात सवलत देते. या सवलतीची रक्कम राज्य सरकार एसटी महामंडळाला देते. ज्येष्ट नागरिकांना एसटीच्या साध्या, रातराणी (परिवर्तन) व निम-आराम (हिरकणी) बसेसमध्ये 50 टक्के, आसन श्रेणीच्या शिवशाही बसमध्ये 45 टक्के तर शयनयान श्रेणीच्या शिवशाहीमध्ये 30 टक्के तिकिट दरात सवलत मिळते.

सन 2017-18 चे एसटीने प्रवास करणाऱ्या एकूण सवलत धारकांची संख्या 38 कोटी होती. त्यापैकी ज्येष्ट नागरिक 32 कोटी 57 लाख 25 हजार होते. त्यांना देण्यात आलेल्या सवलतीचे मुल्य सुमारे 574 कोटी 85 लाख रुपये आहे. हे पैसे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळला देणं आहे.

परिवहन खात्याच्या मंत्री हा एसटी महामंडळाचा कारभारी असतो. राज्यातील परिवहन विभाग मंत्रीपद वाटपात शिवसेनेकडे आले. दिवाकर रावते हे या विभागाचे प्रमुख तर सामाजिक न्याय विभाग भाजपकडे. त्या विभागाचे मंत्री राजकुमार बडोले. याता बडोले आणि रावते यांचा संगम कसा आणि कोण करणार ?

राज्याच्या विधानसभेमध्ये मंत्र्यांनी घोषणा करून सहा महिने उलटून गेल्यानंतरही आज सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी मात्र एसटी महामंडळाने ज्येष्ट नागरिकाच्या वय 65 च ग्राह्य धरलं आहे. मग आता तुम्हीच सांगा मग कसं बोलणार आपलं सरकार कामगिरी दमदार?