ब्लॉग : सोशल मीडियावर विकास गायब, आगपाखडच!

  • Updated On - 4:00 pm, Fri, 5 July 19 Edited By:
ब्लॉग : सोशल मीडियावर विकास गायब, आगपाखडच!
सोशल मीडियासाठी नवी नियमावली घोषित

संपूर्ण समाजमन ढवळून काढण्याची क्षमता असलेल्या सोशल मीडियावर निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आगपाखडच अधिक केली जात आहे. सोशल मीडियातून विकासाचे मुद्दे वापरुन नागरिकांवर प्रभाव पाडण्याची संधी असताना, राजकीय पक्षांकडून सोशल मीडियावर विकासकारणाला बगल दिली असल्याचे सुक्ष्म निरीक्षण नोंदवित, सोशल मिडिया विश्‍लेषक अजित पारसे यांनी कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत कसे मिळेल? असा सवाल उपस्थित केला.

अजित पारसे, सोशल मीडिया विश्लेषक

विदर्भातील मतदानाची प्रक्रिया पार पडली. निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्ष, उमेदवारांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाचा भरभरून वापर केला. मात्र, सोशल मीडियाच्या व्यासपीठावर राजकीय मार्केटिंग सुरू असून सत्ताकारणातून निर्माण झालेली जाती, धर्माची समिकरणेच अधिक प्रभावी मांडण्याचा प्रयत्न होत असल्याची खंत सोशल मीडिया विश्‍लेषक पारसे यांनी व्यक्त केली. जाती, धर्मावरून वाढलेले दीर्घकालीन वैमनस्य देशाच्या सार्वभौमत्त्वाला धोका निर्माण करणारे आहे याकडे राजकीय पक्षांद्वारे दुर्लक्ष होत आहे. सोशल मीडियावर कुठलेही बंधन व वैयक्तिक मर्यादा नसल्याने संपूर्ण आकडेवारीसह विकासाचे मुद्दे मांडणे सहज शक्‍य आहे.

एकविसाव्या शतकातील पिढी केवळ विकासकारणावर लक्ष केंद्रित करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विकासाचे मुद्दे सोशल मीडियावर आल्यास राजकीय पक्षांना सत्तेत आल्यानंतर देशात शांतता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यास बळ मिळेल. परंतु सत्ताकारणामुळे सर्वच पक्षाकडून सोशल मीडियावर विकासाच्या मुद्‌द्‌याला बगल देण्यात आली.

 

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 3600 कोटींचा 14 पदरी दिल्ली-मेरठ महामार्ग तयार केला. ज्यामुळे अदमासे 20 लक्ष नागरिक दररोज यातायात करीत आहेत. भविष्यात पश्चिम उत्तर प्रदेश जागतिक बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर आहे. चीनी तंत्रज्ञांनी या महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून, अभ्यास करीत जागतिक स्तरावर स्तुती केली. परंतू पक्षस्तरावर याची नोंदच नाही. गडकरींनी उत्तरप्रदेशात विकासाचे बीजे रोवली. याचा प्रचारादरम्यान सोशल मीडियात उल्लेखही नाही. मात्र उत्तरप्रदेशात 3600 कोटींचेच हत्तीचे पुतळे तयार करण्याचा मुद्दा सोशल मीडियावर झळकला.

उजनी धरणाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सोशल मीडियावर ‘ट्रोल’ करून नकारात्मक प्रचार झाला. मात्र, बारामतीत कृषी क्रांती घडविण्यात आली, पुण्याला आयटी शहराच्या यादीत मानाचे स्थान त्यांनी मिळवून देत 20 लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. अजित पवारांचे हे विकासकारण सोशल मीडियावर मांडले गेले नाही. प्रकाश आंबेडकरांनी नागरिकांना तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांच्याकडूनही विकासाचे कुठलेही आश्‍वासन, आराखडा सोशल मीडियावर आला नाही, असे पारसे म्हणाले. 50 कोटी तरुणाईला फक्त विकासाची अपेक्षा आहे. राजकीय पक्षांनी तरुणाईला जात व धर्मकारणापासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरजही पारसे यांनी व्यक्त केली.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी 3600 कोटींचा अभूतपूर्व दिल्ली-मेरठ महामार्ग तयार केला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कृषी क्रांती घडवली, पुण्याला आयटी शहराच्या यादीत मानाचे स्थान त्यांनी मिळवून देत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून दिला. अशा मूळ विकासाच्या मुद्याला सोशल मीडियातील प्रचारातून बगल देण्यात आली. कुठल्याही पक्षाला फक्त विकासाच्या मुद्‌द्‌यावरून 100 % बहुमत गाठता येईल , परंतू या विकासकारणाकडे सोशल मीडियावर दुर्लक्ष झाले आहे.