‘बरसू’ तू एकटा नाहीस….

‘बरसू’ तू एकटा नाहीस....

बरसू, वय एक अवघं वर्षे. कडाक्याची थंडी, सुक्या भाकरी, झोपायला नीट काही नाही… आभाळाचंच छत, सर्वत्र धुळीची चादर… अशा स्थितीत बरसू दिल्लीत ठाण मांडून होता. आपल्या आईवरील दीड लाखांचं कर्ज माफ होईल, या आशेने तो दिल्लीतील रामलीला मैदानात आला. सोबत आई सिताराबाई होतीच. दुधपित्या मुलाला घेऊन दिल्लीत येण्याची वेळ का आली? या प्रश्नाच्या उत्तराने माझ्या […]

सचिन पाटील

| Edited By: Team Veegam

Jul 05, 2019 | 4:12 PM

बरसू, वय एक अवघं वर्षे. कडाक्याची थंडी, सुक्या भाकरी, झोपायला नीट काही नाही… आभाळाचंच छत, सर्वत्र धुळीची चादर… अशा स्थितीत बरसू दिल्लीत ठाण मांडून होता. आपल्या आईवरील दीड लाखांचं कर्ज माफ होईल, या आशेने तो दिल्लीतील रामलीला मैदानात आला. सोबत आई सिताराबाई होतीच. दुधपित्या मुलाला घेऊन दिल्लीत येण्याची वेळ का आली? या प्रश्नाच्या उत्तराने माझ्या डोळ्यातंही अश्रू दाटून आले. सिताबाई सांगू लागली… ‘घरी शेती जेमतेमच, घर असूनंही नसल्यासारखं, मग एक वर्षाच्या बरसूला घेऊन कशिबशी शेतात मजुरीला जाते. मिळालेल्या पैशात दोन वेळची चुल पेटते. बरसूला घरी ठेवलं तर पहायला कुणी नाही. आणि 3-4 किमीच्या रानातून दुपारी त्याला दूध पाजायला घरी येणंही शक्य नाही. म्हणून पोटाला पाळणा बांधून मी त्याला शेतात नेते. एक दिवस काम मिळालं नाही, तर उपवास घडतो. असं हलाखीचं जीवन जगताना शेतीवरच्या कर्जामुळे आम्हाला रोज मरणं दिसतंय. ज्या शेतीत लागवड खर्च जाऊन एक रुपयाही पदरी पडत नाही, त्या शेतीच्या भरवशावर दीड लाखांचं कर्ज कसं फेडायचं हाच मोठा प्रश्न आहे. सासऱ्याने घेतलेल्या कर्जाचा बोझा डोक्यावर घेऊन आम्ही जगतोय, आता हेच कर्ज डोक्यावर घेऊन बरसूचाही जन्म झाला. कर्ज फेडू शकत नाही, म्हणून मनात आत्महत्येचा विचार आला. पण बरसू डोळ्यासमोर दिसतो. म्हणून मनगटात आता मरण्याचीही हिम्मत उरली नाही. त्यामुळे कर्जमाफीची आशा घेऊन दुधपित्या बरसूला पोटाला बांधून दिल्लीच्या या मोर्चात सहभागी झालेय’…

ज्या राज्यातले मुख्यमंत्री हनुमानजीची जात शोधण्यात व्यस्त आहे, देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या त्याच बिलासपूरच्या सिताराबाईंची ही व्यथा आहे. दिल्लीत झालेल्या ऐतिहासिक किसान मुक्ती मोर्चात अशा अनेक कहान्या पहायला मिळाल्या. सरकार सोडलं तर दगडांनाही पाझर पुटेल अशा या शेतकऱ्यांच्या व्यथा आहे.

शेतीच्या निरक्षरांसाठी…

गोष्ट काही महिन्यांपूर्वीची आहे, शहरातील कॉनव्हेंटमध्ये शिकलेली, आणि ज्यांच्या चार पिढ्यांनी कधीही शेतीचा धुरा (बांध) ओलांडला नाही. जी शेतीच्या बाबतीत पूर्णता निरक्षर-अज्ञानी आहे. अशा एका मैत्रीणीने माझ्या शेतकरी कर्जमाफीबाबत टाकलेल्या फेसबूक पोस्टवर काही कमेंट्स केल्या…’कशाला हवी शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांना फुकटाचं खायची सवय लागलीय, शेतकरी काम करत नाही, दारु पितात, पैसे उडवतात, मागच्या वेळेस (2008) शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली तरीही ते आत्महत्या करतात, घरच्या भांडणामुळे, जुगारामुळे शेतकरी आत्महत्या करतात, मग सरकारने का द्यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी’ माझी ही मैत्रीण सध्या माध्यमात एका मोठ्या पोस्टवर काम करते. पण हा तिचा दोष नाही. किंवा असा विचार करणारी ती एकटी नाही. एका छोट्याशा खेड्यातून आल्यानंतर शहरातल्या अनेकांच्या याच भावना मी अनुभवल्या. या सर्वांच्या बुद्धीची कीव येते. आता काही प्रमाणात परिस्थिती बदलत चाललीय. शहरातील लोकांना शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व कळायला लागलंय. कारण दिल्लीत झालेल्या शेतकरी मोर्चात 15 हजार पेक्षा जास्त शहरी तरुणांचा सहभाग होता. यात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स होते आणि व्यावसायिकही होते. याशिवाय देशातील वेगवेगळ्या शहरात मोठ्या संख्येने तरुण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरलेले होते. या सर्वांचा तसा थेट शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही. पण केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी ही तरुणाई सत्यावर उतरलेली मी पहिल्यांदाच पाहत होतो.

…आणि गावांच्या मदतीला शहरं रस्त्यावर!

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच काबाडकष्ट करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी दिल्लीकर रस्त्यावर उतरले होते. एरवी शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे असुविधा झाल्याने बोटं मोडणारे दिल्लीकर, यावेळेस जागो जागी बॅनर घेऊन घोषणाबाजी करत शेतकऱ्यांचं समर्थन करताना दिसले. हजारोंच्या संख्येने आलेले विद्यार्थी शेतकऱ्यांसाठी घोषणा देत होते. त्यामुळे शेतीत पिकलं नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांनी धिर सोडू नये, आता भारताच्या या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी इंडियातला तरुणही पुढे आलाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई फक्त गावं लढणार नाही, तर शहर आणि गावं एकत्रपणे ही लढाई पुढे नेणार आहे. उशीरा का होईना याची सुरुवात दिल्लीतील किसान मुक्ती मोर्चाच्या निमित्ताने झालीय.

उद्योगपतींना पायघड्या, शेतकऱ्यांना का नाही?

दिल्लीत पार पडलेल्या ऐतिहासिक शेतकरी मोर्चात प्रामुख्याने तीन मागण्या होत्या…

-शेतकरी कर्जमाफी

-शेतमालाल उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा

-या मागण्या मान्य करण्यासाठी संसदेचं विषेश अधिवेशन बोलवा

आपल्या देशात उद्योगपतींना कुठलेही अर्ज न मागवता, कुठलेही निकष न लावता, सरसकट कर्जमाफी केली जाते. राष्ट्रीयकृत बँकांनी गेल्या 10 वर्षात एकूण 4 लाख 584 कोटी रुपये इतकी रक्कम उद्योगपतींच्या एन.पी.ए. खात्यात वर्ग केली. यापैकी 3 लाख 3 हजार 394 कोटी रुपये ही रक्कम 2015 ते 2018 या चार वर्षात वर्ग केली आहे. उद्योगपतींना टॅक्स इंसेन्टिव्ह दिला तो वेगळाच आहे. गेल्या चार वर्षात केंद्रीय बजेटनुसार कॉर्पोरेट हाऊसेस, गर्भश्रीमंतांना साधारण 22 लाख कोटी रुपयांची टॅक्समध्ये सवलत दिली आहे. आता कॉर्पोरेटला ऐवढ्या पायघड्या घातल असेल, तर मग देशाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा अधिकार का नाही? हा प्रश्न दिल्लीतील मोर्चात जमलेले दोन लाख शेतकरी सरकारला विचारत होते, पण बधिर झालेल्या सरकारपर्यंत बळीराजाची ही हाक ना आता पोहोचली आणि पूर्वीच्या सरकारने शेतकऱ्यांची ही बाजू कधी ऐकून घेतली.

सही विकास साफ नियत… खरंच आहे?

गणिताच्या परीक्षेत मेथड चुकली तर त्याचं उत्तरही चुकतं. केंद्र सरकारच्या बाबतीत असंच झालंय. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव देऊ, अशी घोषणा केंद्र सरकारने केली. पण उत्पादन खर्च काढण्याची मेथड ‘साफ नियत सही विकास’च्या विपरीत होती. त्यामुळे कागदावर शेतमालाला मिळालेले दीडपट हमीभाव आमच्या बळीराजापर्य़ंत पोहोचलेच नाही. आणि त्यामुळेच परिस्थिती बदलली नाही. त्यामुळेच देशातल्या साधारण दोन लाख शेतकऱ्यांनी ही मागणी घेऊन थेट दिल्ली गाठली. कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमीभावासाठी संसदेचं विषेश अधिवेशन बोलवा, अशीही मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली होती. सरकारच्या साध्या मंत्र्यांनीही याची दखल घेतली नाही. गेल्या सरकारचा अनुभव पाहता शेतकऱ्यांच्या मोर्चात मंचावर आलेल्या राजकीय नेत्यांकडूनही काही अपेक्षा नाही.

साडेतीन लाख शेतकऱ्यांचं व्यर्थ ना हो बलीदान!

देशात आजपर्यंत साडेतीन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आजही लाखो शेतकरी मरणाच्या दारात उभे आहेत. इथल्या शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर आता देशभरातील शेतकरी जात, धर्म नाही तर शेतीच्या नावावर एकजूट व्हायला लागलेत. दिल्लीच्या मोर्चात 22 पेक्षा जास्त राज्यातून आलेल्या शेतकऱ्यांची भाषा, पंथ, जात, धर्म, वेशभूषा वेगळी होती. पण या शेतकऱ्यांच्या समस्या मात्र सारख्याच होत्या. शेतीच्या संकटात मरण अणुभवलेले हे शेतकरी होते. आता एकजूट होऊन उद्याच्या पिढीसाठी नव्या लढाईची मशाल पेटवत होते. या लढाईत एक वर्षाचा बिरसूही होता… पण आता बिरसू तू एकटा नाहीस. बिरसू आणि शेतकऱ्यांच्या या लढ्यात आता इंडिया म्हणजेच शहरातील तरुणंही मैदानात उतरलेय, हेच किसान मुक्ती मोर्चाचं खरं यश आहे.

– गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें