केरळात सत्ताधारी माकपची उमेदवार यादी कशीय?

केरळात माकपप्रणीत LDF आणि काँग्रेसप्रणीत UDF आघाडीमध्येच पारंपरिक सामना होतो. इथं 1977 चा अपवाद वगळला तर केरळात सत्ताधाऱ्यांना कधीच सत्ता राखता आली नाही. (Kerala Legislative Assembly Election 2021 )

  • गजानन कदम, कार्यकारी संपादक, टीव्ही 9 मराठी
  • Published On - 18:39 PM, 13 Mar 2021
केरळात सत्ताधारी माकपची उमेदवार यादी कशीय?

डाव्या विचारसरणीच्या पक्षांमध्ये नेत्याचं स्तोम वाढू दिलं जात नाही. पक्षापेक्षा नेता महत्त्वाचा नाही हाच या पक्षांचा आधार. नेत्यांनी सत्तेचा लोभ लागू देऊ नये अशाच तिथं सूचना असतात. माकप, भाकप, फॉरवर्ड ब्लॉक वगैरे पक्षांचं राजकारण याच सूत्रांनी चालत आलंय. पण या पक्षांची लोकप्रियता आता चांगलीच घटलीय. पश्चिम बंगाल आणि केरळ हे या डाव्या पक्षांचे बालेकिल्ले. पण ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमधला डाव्यांचा गड काबीज केल्यानंतर आता केरळात काय होतंय याची उत्कंठा साऱ्या देशाला आहे. 2006, 2011 आणि 2016 अशी तीन वर्षे सत्तेत राहिलेल्या माकप आणि त्यांच्या आघाडीला काँग्रेसची आघाडी सत्तेतून खेचते का ? याची उत्कंठा आहे. केरळात माकपप्रणीत LDF आणि काँग्रेसप्रणीत UDF आघाडीमध्येच पारंपरिक सामना होतो. इथं 1977 चा अपवाद वगळला तर केरळात सत्ताधाऱ्यांना कधीच सत्ता राखता आली नाही. यावेळी काँग्रेसप्रणीत UDF बाजी मारते का याचे औत्सुक्य असेल. शिवाय यावेळी भाजपनं मेट्रो मॅल श्रीधरन यांना उतरवून हवा निर्माण केलीय. मुस्लिमबहुल राज्यात भाजपची गाजराची पुंगी किती वाजते याची देशालाही उत्कंठा आहे.

11 मार्चला माकपची 83 उमेदवारांची पहिली यादी जारी झाली. या यादीवर नुसती नजर टाकली तर हा पक्ष ठरवलेल्या नियमानुसार कसा काटेकोरपणे चालतो याची झलक बघायला मिळेल. 5 मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष श्रीरामकृष्णन आणि 33 आमदारांना माकपनं डच्चू दिलाय. हे आकडे पुन्हा एकदा बघा. इतर कुठल्या पक्षाने कुठल्याही राज्यात अशी उमेदवार यादी जारी केली असती तर नुसता हलकल्लोळ माजला असता. बंडखोरांचे पेव फुटले असते. पक्षाला रामराम करुन आयारामांची वाट पाहणाऱ्या पक्षांमध्ये गेले असते. पण केरळात तसं अजिबात झालं नाही. उलट एवढ्या विद्यमान आणि मातब्बर लोकांना का वगळलं याचं कारण देताना माकपचे सरचिटणीस ए विजयराघवन यांनी काय म्हंटलंय बघा. ” आम्ही कुणालाही वगळलं नाही. संसदीय काम आणि पक्षीय जबाबदारी दोन्ही तितकीच महत्वाची आहे. पक्षासाठी काम करण्यासाठी सरकारी जबाबदारी हा एकमेव निकष नाही. संघटनात्मक जबाबदारीही माकपमध्ये सर्वोच्च आहे”

ज्यांनी दोन वेळा आमदारकी भूषवली आहे, त्यांना पुन्हा उमेदवारी नाही असा निकष दाखवून माकपनं 39 आमदार-मंत्र्यांना डच्चू दिलाय. त्याविरुद्ध कुणीही हूँ की चूँ केलं नाही. कारण तेच ते उमेदवार हे पश्चिम बंगालमधल्या पराभवाचे कारण होते आणि त्यातून केरळच्या शाखेनं धडा घेतलाय. माकपच्या उमेदवारांमध्ये 83 पैकी 33 नवे चेहरे आहेत. मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्यासह पाच मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. 83 पैकी 12 उमेदवार महिला आहेत, 2016 च्या निवडणुकीतही एवढ्याच महिला उमेदवार होत्या. 12 उमेदवार 40 पेक्षा कमी वयाचे आहेत. 4 उमेदवार तर 30 पेक्षाही कमी वयाचे आहेत. पण 50 वर्षांपुढचे 57 आणि 60 वर्षांपुढचे 24 उमेदवार या यादीत असल्यानं तरुण तुर्कांपेक्षा म्हाताऱ्या अर्कांचाच प्रभाव असल्याचं दिसून येतं.

माकपच्या उमेदवार यादीचे वैशिष्ट्य म्हणजे यात चार पिढ्यांचे प्रतिबिंब आहे. 27 वर्षे वयाचा उमेदवार सर्वात तरुण आहे तर 75 वर्षांचे उमेदवार सर्वात ज्येष्ठ आहेत. मुख्यमंत्री पिनरयी यांचे जावई रियास यांचाही उमेदवारांमध्ये समावेश आहे. 2019 ला त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती, पण ते पराभूत झाले होते. बहुधा त्यांची ही शेवटची निवडणूक असेल.

संबंधित बातम्या

Kerala Election 2021 : केरळमध्ये काँग्रेसला मोठा झटका, पक्ष नेतृत्वावर आगपाखड करत पीसी चाको यांचा राजीनामा

केरळमध्ये CPIM चा मोठा निर्णय, तरुणांना संधी देण्यासाठी 5 मंत्र्यांसह 25 आमदारांचं तिकिट कापलं

Kerala Legislative Assembly Election 2021 : What is the list of ruling CPI (M) candidates in Kerala?