EXCLUSIVE : राज्याच्या कृषी विभागाची ‘अळी’मिळी गुपचिळी

EXCLUSIVE : राज्याच्या कृषी विभागाची 'अळी'मिळी गुपचिळी


ब्रम्हा चट्टे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

लष्करी अळीने देशातील शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केले आहे. खरीप हंगामात 84 हजार 486 हेक्टरवरील मका पिकाचे नुकसान लष्करी अळीने केल्याची माहिती स्वत: केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी राज्यसभेत दिली. कर्नाटकात 81 हजार, तेलंगणात 1 हजार 740, आंध्र प्रदेशात 1 हजार 431 आणि तामिळनाडूत 315 हेक्टर शेती क्षेत्राचं लष्करी अळीमुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लष्कर अळीग्रस्त राज्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव नाही. मात्र, ‘टीव्ही 9 मराठी’ने महाराष्ट्रातील शेती क्षेत्राचा अभ्यास करुन, स्पेशल रिपोर्ट तयार केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही लष्करी अळीने अक्षरश: धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांना हतबल केले आहे.

लष्करी अळीचा महाराष्ट्रालाही वेढा

महाराष्ट्रातील शेतकरी सध्या दुष्काळाला तोंड देत आहेत. आता ऐन दुष्काळातच शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आलं आहे. जणू दुष्काळात तेरावा महिनाच. शेतकऱ्यांसह तुमच्या आमची सगळ्यांची झोप उडवणारी गोष्ट घडते आहे.

एका किडीने सध्या शेतकऱ्यांचं जीणं मुश्किल करुन टाकलंय. या किडीला अन्नसुरक्षेसाठी जागतिक धोका जाहीर करण्यात आलं आहे. या किडीने आफ्रिकेमध्ये 200 कोटी 20 लाख डॉलर्सचं पीक नेस्तनाबूत केलं आहे. तर अमेरिकेतही या किडीने थैमान घातला आहे. ही कीड जगभरात वेगाने पसरत आहे. आता या किडीने भारतातही प्रवेश केला असून, तिचा प्रसार महाराष्ट्रात ही वेगाने होत आहे. जवळजवळ प्रत्येक गावात आणि मक्याची शेती, ज्वारीची शेती आणि ऊसाची शेती या किडीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे.

मक्यावर अळीचा कब्जा

शेतमालाला भाव नसताना त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो चाऱ्याचा आणि चारा म्हणून शेतकरी सगळ्यात जास्त मका या पिकाचा उपयोग करतात. त्यानंतर शेतकरी उपयोग करतात ज्वारीपासून बनलेल्या कडब्याचा आणि त्यानंतर आणीबाणीच्या प्रसंगी उसाचा वापर चारा म्हणून केला जातो. सध्या मक्याची शेती संकटात आहे. मक्याला एका नव्या किडीने ग्रासले आहे. ही कीड एका रात्रीत मक्याचा फडाचे होत्याचं नव्हतं करुन ठेवते. त्यामुळे महाराष्ट्रात हाहा:कार माजला आहे. मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लष्करी कीड मका पिकाचे पाने खाऊन नुकसान करते. प्रथमावस्थेतील अळी कोवळ्या पानांवर उपजीविका करते. एका बाजूने खरडवून खाल्ल्यामुळे पानावर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसर्‍या व तिसर्‍या अवस्थेतील अळ्या पानावर छिद्र पाडून पाने खायला सुरुवात करतात. मका पीक पोंग्यामध्ये असताना जर किडीचा प्रादुर्भाव झाला तर पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल गोल छिद्र दिसून येतात. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे एका मक्याच्या झाडावर आपणास एक किंवा जास्तीत जास्त दोन अळ्या आढळून येतात. मका पिकात सुरुवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतो. मात्र, नंतरच्या अवस्थेत पूर्ण पोंग्याचे नुकसान होते. मक्याच्या एका झाडावर एक आळी असेल तर उत्पादन जवळपास 50 टक्केपर्यंत घट येऊ शकते.

कशी असते लष्करी अळी?

या अळीचे जीवन चक्र भारतीय वातावरणात 35 ते 45 दिवसात पूर्ण होते. या आळीला अमेरिकन लष्करी अळी या नावाने ओळखले जाते. भारतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव जून महिन्यात मका पिकावर झाल्याचा सर्वप्रथम नोंद करण्यात आले. महाराष्ट्रमध्ये या अळीची नोंद ऑगस्ट महिन्यात सोलापूर येथे करण्यात आली. ही अळी सहजपणे ओळखण्याचे लक्षण म्हणजे अळीच्या डोक्यावर उलट्या वाय आकाराची खूण दिसून येते. तसेच तिच्या शरीराच्या आठव्या सेगमेंटवर 4 काळ्या  रंगाचे ठिपके चौकोनी आकारात दिसून येतात. शरीरावर वरच्या बाजूस फोडी आल्यासारखे काळे ठिपके दिसून येतात. त्यामध्ये लहान काळा रंगाचे केस दिसून येतात.

पोल्ट्री उद्योगही संकटात

या अमेरिकन लष्कर आळीने गोरगरिबाचा प्रोटीन असणारे पोल्ट्री उद्योग संकटात आला आहे. तर पशुखाद्य उद्योगावरही भीतीचे सावट आहे. भारतात खरीप आणि रब्बी हंगाम मिळून सुमारे 1 एक कोटी हेक्टरवर क्षेत्रावर मक्याचे पीक घेतले जाते. देशातील एकूण मक्याखालील क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा दहा टक्के आहे, तर एकूण मका उत्पादनातील वाटा सुमारे पंधरा टक्के आहे. देशात खरीप व रब्बी दोन्ही हंगाम मिळून गेल्या वर्षी 273 लाख टन मका उत्पादन झाले होते.

देशातील एकूण मका उत्पादनातील 60 टक्के खप पोल्ट्री उद्योगावर होतो. लष्करी अळीसारख्या संकाटामुळे जर देशातला मका पुरवठा खंडीत झाला तर चिकन आणि अंड्यांच्या उत्पादनालाही फटका बसेल. देशात सुमारे एक कोटी शेतकरी मका पिकावर अवलंबून आहेत, तर पोल्ट्री उद्योगावर प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या 50 लाख लोकांचे जीवनमान अवलंबून आहे.

देशातील कॅटल फीड आणि ह्युमन फूड सिक्युरिटीच्या दृष्टीने मका हे अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. लष्करी अळीसारख्या संकटाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाची अन्न सुरक्षा धोक्यात आणण्यासारखे होईल.

राज्याला ना पूर्णवेळ कृषिमंत्री, ना कृषी सचिव

राज्याच्या कृषी विभागाला सध्या पूर्णवेळ कृषी सचिव नाही आणि पूर्णवेळ कृषिमंत्री नाही. अशा अवस्थेत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या कोण सोडवणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे.

कृषी सचिवांचा बोलण्यासही नकार

प्रभारी कृषी सचिव एकनाथ डवले. यांनी अशा कुठल्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव राज्यात झाला नसल्याचे स्पष्टपणे नमूद केलं आणि आमच्याशी बोलण्यास नकार दिला आमच्या प्रतिनिधिनी वारंवार त्यांना सांगितलं की आम्ही स्वतः लोकांमध्ये गेलोय लोकांचे व्हिडिओ आहेत. तरीही कृषी सचिवांनी अशा कोणत्याही किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे नोंद नसल्याचे सांगितले. यावर बोलण्यास नकार दिला.

आगामी दुष्काळात चारा समस्या शेतकऱ्यांना होणारे लाखोंचे नुकसान यावर राज्यातल्या कृषी विभागाला काहीच वाटत नाही. शेतकऱ्यांना मदत तर सोडाच, पण अशी कोणती अळी असल्याचे मान्यही राज्याचे कृषी विभाग करत नाही. कृषी विभागाने स्पष्टपणे लष्करी अळीच्या समस्येबाबत ‘अळी’मिळी गुपचिळी अवलंबली आहे.

EXCLUSIVE REPORT :