BLOG: दुर्घटना, पत्रकार आणि मृत्यू

  • Updated On - 4:12 pm, Fri, 5 July 19 Edited By: Team Veegam
BLOG: दुर्घटना, पत्रकार आणि मृत्यू

पंकज दळवी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: सीएसएमटी स्थानकाबाहेरील ब्रिज पडला आणि आम्हा टीव्ही पत्रकारांची धावपळ सुरु झाली. अशी दुर्घटना आणि त्यानंतरची आमची धावपळ मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी अनेकवेळा अनुभवली आहे. घटनेनंतरची ड्रामेबाजी कव्हर केली आहे. यावेळी टीव्हीची गरज म्हणून काही गोष्टी मनात नसतानाही कराव्या लागतात. अर्थात हा प्रोफेशनल भाग आहे. मृतांचा आकडा शोधला जातो. त्यांचे पत्ते, नातेवाईक प्रतिक्रिया, शेजारी प्रतिक्रिया अशी पुढची प्रक्रिया सुरु होते. पण जेव्हा आपण कव्हर करत असलेल्या दुर्घटनेत आपलं कोणी जातं तेव्हा?  हो हा अनुभव मी आणि माझ्या काही मित्रांनी घेतला आहे.

28 सप्टेंबर 2013 सकाळी लवकर अशीच बातमी आली.  माझगावातील महानगर पालिका कर्मचारी इमारत संपूर्ण कोसळली. झालं आमच्यासाठी ब्रिगेड कॉल. मी आणि माझे अनेक टीव्ही आणि प्रिंटचे मित्र घटनास्थळी पोचलो. काम सुरु केलं. मृतदेह, जखमी, त्यांचे नातेवाईक सगळा खेळ सुरु होता. आणि अचानक एक जण म्हणाला आरे योगेश पण इथेच राहतो यार. बघा कॉल करा. मी लगेच योगेशला कॉल लावला. पण फोन लागत नव्हता.

“योगेश पवार” एक जाणता आणि सच्चा पत्रकार. सकाळ या वर्तमानपत्रात ट्रान्सपोट बीट कव्हर करायचा. आमच्यासाठी ट्रान्सपोटमधला एन्सायक्लोपेडीया. काम सुरु असताना योगेशचा शोध सुरु होता. ढिगाऱ्याखाली मृतदेह सापडत होते.  एव्हाना योगेश या दुर्घटनेट सापडलाय हे समजलं होतं… योगेशचे काका आणि नातेवाईक संपर्कात होते. मिळालेला मृतदेह योगेशचा नाही ना हे आम्ही तपासून बघत होतो. अजूनही योगेश नावाचा पत्रकार ढिगाऱ्याखाली स्वभावानुसार लढत असेल याची खात्री होती.

एनडीआरफची टीम काम करत होती. दुसऱ्या दिवशी शोधकाम सुरु होतं. आम्ही काम करत होतोच. जवळ जवळ सर्व मृतदेह हाती लागले होते. ढिगारा उपसत असताना अचानक एक मृतदेह हाती लागला. लगेच ऑफिसला कळवलं अजून एक मृतदेह सापडला. मी धावत गेलो. हो तो माझा पत्रकार मित्र योगेश पवारचा मृतदेह होता.

काही क्षण सर्व होती नव्हती ती सर्व ताकद गळून पडली. रक्ताने माखलेला योगेश अम्बुलेन्सच्या स्ट्रेचरवर निपचित पडला होता. अम्बुलेंस सायरन वाजवत निघून गेली. त्याच मनस्थितीत ऑफिसला फोन केला “माझगाव इमारत दुर्घटनेत पत्रकार योगेश पवारचा मृत्यू”