BLOG : होय, राज ठाकरेंना भाजपने सिरीयस घेतलंय!

BLOG : होय, राज ठाकरेंना भाजपने सिरीयस घेतलंय!

राज ठाकरे म्हणजे हवेचा फुगा आहे, राज ठाकरेंना बारामतीवरुन स्क्रीप्ट लिहून येते आणि तो पोपट वाचतो, राज ठाकरे म्हणजे इंजिन नसलेली रेल्वे आहे… या आणि अशा अनेक टीका जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते सभांमधून मोठ्या जोशात लोकांना दाखवण्यासाठी करत असले, तरी मनानं मात्र त्या सगळ्यांनी राज ठाकरेन सिरियस घेतलंय. 6 एप्रिल रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात राज यांनी गुढी पाडव्याची सभा घेतली आणि त्यातच त्यांनी मोदी-शाहा जोडीवर जोरदार टीका केली.

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे त्यांनी अगोदरच जाहीर केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे महाराष्ट्रभर सभा घेणार नाहीत, असं भाजपच्या नेत्यांना वाटत होतं. गेलेच तर ते राष्ट्रवादीच्या मंचावर जातील, असे बरेच तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र हे सगळे तर्कच राहिले आणि राज यांनी मोदी-शाहांना हटवण्यासाठी मनसे स्वतंत्र सभा घेईल, असं जाहीर केलं.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 6 सभांची ठिकाणंही निश्चीत झाली. त्यातली पहिली सभा प्रचंड जनसमुदायासमोर दोनच दिवसांपूर्वी नांदेड इथं पार पडली आणि कालच्या सोलापूरच्या सभेला लोकांनीही प्रचंड प्रतिसाद दिला. इतर कुठलाही राजकारणी असो प्रत्येक सभेत तेच तेच मुद्दे लोकांसमोर मांडतात. राज मात्र याला अपवाद दिसत आहेत. प्रत्येक सभेतल्या त्यांच्या मुद्यात नाविन्य दिसत आहे.

पाडव्याच्या सभेत असो किंवा त्यापूर्वी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात असो राज यांनी भाजपवर, खासकरून मोदींवर निशाणा साधला. तो फक्त बोलण्यातून नाही तर मोदींचेच जुने व्हिडीओ दाखवून यांनी देशाला कसं फसवलंय, हे आधी काय बोलायचे आणि नंतर काय बोलायला लागले हे सगळं पुराव्यानीशी जनतेसमोर मांडलं. नोटबंदी असो, पुलवामाचा हल्ला असो किंवा जवानांच्या नावानं मागितलेली मतं असो, हे सगळं राज यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडलं. राज खोट बोलत आहेत, असं म्हणता येणार नाही. कारण ते पुराव्यासह आपल्या गोष्टी मांडत आहेत आणि लोकांनाही त्या पटत आहेत.

राज ठाकरे यांच्या मनसे या पक्षाचा उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीला उभा नाही. त्यामुळे भाजपचा राजकीय प्रतिस्पर्धी मनसे नसून काँग्रेस-राष्ट्रवादी आहेत. पण तसं मात्र दिसत नाही. सभेची सुरुवातच राज ठाकरे यांच्या मुद्द्यांपासून मुख्यमंत्र्यांना करावी लागते, राज यांची सभा संपते न संपते तोच राज यांच्या भाषणावर बोलण्यासाठी पत्रकार परिषदेला विनोद तावडेंना पत्रकारांना बोलवावं लागतं. याला नेमकं काय म्हणायचं…?

राज यांच्या सभेचा खर्च कोणाच्या खर्चात धरायचा यासाठी निवडणूक आयोगाला पत्र लिहाव लागतं, प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर टिका करण्यापूर्वी आणि त्यांच्या टीकेला उत्तर देण्यापूर्वी जर राज यांच्यावर भाजपला बोलावं लागत असेल तर राज ठाकरेंना त्यांनी किती सिरीयस घेतलंय हे दिसून येतंच आहे.

बोलताना राज नेमकं भाजपच्या मर्मावर बोट ठेवत आहेत. बोलून सांगण्यापेक्षा चित्राच्या माध्यमातून मांडलेल लोकांना लवकर पटतंय, त्यावर लवकर विश्वास बसतो… हेच राज यांनी हेरल आणि त्यानुसारच राज लोकांसमोर डिजीटल प्रचार घेऊन जात आहेत.. आतापर्यंत महाराष्ट्र दौऱ्यातील राज यांनी दोनच सभा घेतल्या आहेत… त्यामुळे राज कोणती तोफ डागणार आणि तिच्यावर त्यांना सिरियस घेणारे काय प्रत्युत्तर देतात हे सहा सभांमधून पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे… राज यांच्या या डिजिटल प्रचाराचा निकाल नेमका कसा आहे, हे 23 तारखेच्या निकालानंतरच दिसून येईलच.

(सूचना : सदर ब्लॉगमधील मतं ही ब्लॉगलेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)