BLOG: गांधी, हिंदू आणि बंदूक

गांधी आज आले तर ... देशातला मोठा समूह आपलं ऐकत का नाही म्हणून स्वतःला दोष देत बसले असते. मीच पापी असं म्हणत ताडताड स्वतःच्या थोबाडावर मारते झाले असते. मौन, उपास केले असते. देहाला पीडा दिली असती (Mahatma Gandhi's way of fighting).

BLOG: गांधी, हिंदू आणि बंदूक

गांधी आज आले तर … देशातला मोठा समूह आपलं ऐकत का नाही म्हणून स्वतःला दोष देत बसले असते. मीच पापी असं म्हणत ताडताड स्वतःच्या थोबाडावर मारते झाले असते. मौन, उपास केले असते. देहाला पीडा दिली असती (Mahatma Gandhi’s way of fighting). देशभर वेगवेगळ्या लोकांना भेटले असते. शेवटच्या माणसांमध्ये राहिले असते. त्यांनी काश्मीर खोऱ्याचा कानोसा घेतला असता. सत्तेने आरोपी, गुन्हेगार, तथाकथित देशद्रोही ठरवलेल्यांची घरं शोधली असती. शाहीनबागच्या भगिनी महिलांच्या अश्रूंचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला असता. ते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर गेले असते. जिथं दमनाने सर्वात जास्त क्रूरता गाठलीय तो भारतातला कोपरा कोपरा त्यांनी गाठला असता.

दमन, क्रूरता, अश्रू, शोषण यांचे नवनवे अर्थ लावण्याचे नाना खटाटोप महात्मा गांधींनी केले असते. विचारी लोकांशी डोकेघाशी मांडली असती. लेखक, कवींच्या लेखणीच्या साक्षी काढल्या असत्या. आटापिटा केला असता. देशभरच्या पायपीटीतून त्यांनी विरोधकांशी, सत्तेशी झुंजायचं नवं तंत्र शोधलं असतं आणि त्यातून अशी चळवळ त्सुनामी उभी केली असती, की मोदी, शाह आणि त्यांच्या संघटनांना फरफटत मागे यायला भाग पाडलं असतं किंवा निष्प्रभ केलं असतं.

आपल्या विरोधकांनी क्रिया करायच्या, त्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या मागे घरंगळत राहायचं हे गांधींना मान्य नव्हतं. मोदी, शाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरेसेस) हे गांधींच्या लेखी महत्वाचे नाहीत. भारताचे लोक आपल्या बाजूनं अधिक संख्येने भक्कमपणे उभे कसे करायचे ही चिंता त्यांनी वाहिली असती. ते रात्र-रात्र झोपले नसते. स्वतःला सोलत राहिले असते.

काल (30 जानेवारी) गांधी नामस्मरणाचे कार्यक्रम झाले, पण काही नवा कार्यक्रम कुणी मांडल्याचं दिसलं नाही. प्रतिक्रिया देणारी भाषणं झाली, ती गरजेची. पण पुढे काय? नवा अजेंडा कुणी देताना दिसलं नाही.

प्रतिक्रियात्मक आंदोलनं, भाषणं, मोर्चे, रॅली सत्तेला हवीच आहेत. त्यानं त्यांचं फार नुकसान होईल असं दिसत नाही. मोदी, शाह यांच्या जादूला भुललेल्या, भाळलेल्या माणसांना पुन्हा माघारी फिरवणारी आजची दांडी यात्रा आणि मिठाचा सत्याग्रह व्हायला हवा. युसूफ मेहेरअली यांना सुचली तशी देशाच्या काळजाला भावणारी, इंग्रजांचं तख्त हादरवणारी ‘भारत छोडो’सारखी आजच्या काळाची घोषणा कुणाला सुचली तर फरक पडेल.

गांधींचा हिंदू माणसांवर लोभ होता. त्यांनी हिंदू माणसांना नवनव्या प्रयोगांना जुंपून टाकलं असतं. नव्या प्रयोगात गुरफटलेल्या सर्जनशील माणसांजवळ बंदूक हातात घ्यायला वेळ नसतो. कर्तबगारीत गुरफटलेला माणूस कुणाचा द्वेष कशाला करील, हे गांधींना माहीत होतं.

देशभर केंद्र सरकारविरोधी आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनात महिला, तरुण पुढे आहेत. आंदोलकांच्या हातात गांधी, आंबेडकरांचे फोटो आहेत. काही झालं तरी शांततेचा भंग होऊ देणार नाही हा आंदोलकांचा निर्धार आहे. वेगळी, हिंसक भाषा करणाऱ्यांना महिला अडवतात. बाजूला करतात. हे शाहीनबागेत दिसलं. या शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक रूप यावं असा प्रयत्न होतानाही दिसत आहे. कार्यकर्त्यांची माथी भडकावणं आणि त्यातून तरुणांनी नेत्यांच्या इशाऱ्याने आंदोलनांवर गोळीबार करणं याचे अनेक प्रकार सुरु समोर आले आहेत.

सामान्य तरुणांवरील हल्ल्यांची सुरुवात जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याने झाली. त्या घटनेपासून या घटनांच संख्या वाढत आहे. या हल्ल्यात आरोपी असलेली शीतल शर्मा ही हल्लेखोर युवती संघ परिवाराशी संबंधित आहे, असा संशय घेतला जातोय. त्यानंतर गांधी स्मृतिदिनी गोपाळ शर्मा या माथेफिरु तरुणाने राजघाटवर चाललेल्या जामिया मिलियाच्या मुलांवर दिल्लीत गोळी झाडली. त्यात एक आंदोलक जखमी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच कपिल गुज्जर या तरुणाने शाहीनबागमधील आंदोलकांच्या दिशेनं 2 गोळ्या झाडल्या.

शीतल, गोपाळ आणि कपिल हे कळसूत्री बाहुले आहेत. त्यांचे करविते धनी वेगळे आहेत. गांधींना नथुराम गोडसे याने गोळ्या घातल्या होत्या, मात्र त्याला अतिरेकी बनवणारे मेंदू दुसरे होते. शीतल, गोपाळ, कपिल यांच्या मागचे मेंदू देखील वेगळे असून तेच खरे गुन्हेगार आहेत. या मेंदूचा बंदोबस्त कसा करायचा, त्यांना एकटं कसं पाडायचं याची चिंता आज गांधी असते तर त्यांना सर्वात जास्त सतावत असती.

– राजा कांदळकर, लेखक लोकमुद्राचे संपादक आहेत.

(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)