बिहारच्या दोन्ही संभाव्य उपमुख्यमंत्र्यांचं शिक्षण किती?

बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं नाव बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कटिहार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार तारकिशोर प्रसाद यांचं आहे. तसेच बेतिया मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार रेणू देवी यांचं नावही उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:01 PM, 16 Nov 2020
1/6
बिहारमध्ये उपमुख्यमंत्रीपदासाठी दोन नावं समोर आली आहेत. यामध्ये पहिलं नाव बिहारमधील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कटिहार मतदारसंघातून निवडून आलेले आमदार तारकिशोर प्रसाद यांचं आहे. तसेच बेतिया मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार रेणू देवी यांचं नावही उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. बिहारला दोन उपमुख्यमंत्री मिळतील अशी चर्चा सध्या सुरु आहे. दोन उपमुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय झाला तर हे दोन्ही नेते उपमुख्यमंत्री होऊ शकतात.
2/6
तारकिशोर प्रसाद हे 64 वर्षांचे असून त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. सलग चार टर्म ते कटिहार मतदारसंघातून विजयी झाले आहेत. कटिहारसोबतच पुर्णिया, भागलपूर या जिल्ह्यांमध्येही ते लोकप्रिय आहेत.
3/6
विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रातील माहितीनुसार तारकिशोर प्रसाद करोडपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.9 कोटी रुपये इतकी आहे. कटिहार विधानसभा मतदारसंघात त्यांनी राजदच्या डॉ. राम प्रकाश महतो यांचा पराभव केला आहे. तारकिशोर वैश्य समाजाचे प्रतिनिधित्व करतात. वैश्य समाज भाजपची वोट बँक मानली जाते. बिहारमध्ये वैश्य समाजातील एकूण 24 आमदार निवडून आले आहेत. त्यापैकी 15 आमदार भाजपकडून विजयी झाले आहेत.
4/6
तारकिशोर यांच्याप्रमाणेच आमदार रेणू देवी यादेखील चौथ्यांदा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यांनी मुजफ्फरपूर विद्यापीठातून इंटरपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 2005 ते 2009 या काळात रेणू देवी यांनी बिहारच्या क्रीडा, कला आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून कामकाज केलं आहे.
5/6
बिहार विधानसभा निवडणुकीत 74 जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे अतिमागास समाजातील मतदार आणि महिला मतदारांकडे लक्ष आहे. रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपा त्यांचं राजकीय समीकरण प्रत्यक्षात उतरवू शकते.
6/6
बिहारमधील नोनिया, बिंद, मल्लाह, तुरहा या अतिमागास जातींमधील मतदारांमध्ये भाजपची विचारसरणी रुजवण्यासाठी भाजपकडून रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं.