अजितदादांचा महायुतीला फायदा झाला नाही? देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; संघाच्या बैठकीत काय घडलं?
संघ परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक दर तीन महिन्यांनी होत असते. त्याच मालिकेत काल रात्री संघाची बैठक झाली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व संघटनांमध्ये समन्वय असावा या अनुषंगाने ही बैठक अत्यंत महत्त्वाची होती असे बोलले जात आहे.
सुनील ढगे, गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबत घेतल्याचा महायुतीला फारसा फायदा झाला नसल्याचं म्हटलं आहे. तसेच अजित पवार गटाची मते भाजपला ट्रान्स्फरच झाली नसल्याचंही म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं. संघाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांबाबतची नाराजी बोलून दाखवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांसमोर ही कबुली दिल्याचं सांगितलं जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात संघ परिवाराची महत्त्वाची समन्वय पार पडली. नागपूरच्या ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या मुंडले सभागृहात ही बैठक झाली. या बैठकीला संघाचे सहसरकार्यवाह अरुणकुमार यांच्यासह संघाचे विदर्भ विदर्भ प्रांताचे अधिकारी उपस्थित होते. काल रात्री उशिरा तब्बल अडीच तास ही बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत संघ संबंधित विविध संस्थांकडून आढावा घेण्यात आला. या बैठकीत संघ परिवारातील सर्व 36 संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते असं सांगण्यात आलं.
ठाकरेंनी धोका दिला
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या बैठकीत भाषण झाले. उद्धव ठाकरे यांनी दिलेला धोका आणि अजित पवार यांना आपण सोबत का घेतले? याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार यांना सोबत घेण्याच्या निर्णयावर संघ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. इतरांना सोबत घेतल्याने आपल्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचंही संघ पदाधिकाऱ्यांनी म्हटल्याचं समजतं. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी बरीच माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय परिस्थिती पाहून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला त्यामुळे हे समीकरण जुळवावं लागल्याचं फडणवीस यांनी बैठकीत सांगितल्याचं सांगितलं जात आहे.
मते ट्रान्स्फर झाली नाही
अजित पवारांना सोबत घेऊन महायुतीला अपेक्षित फायदा झाला नाही. भाजप आणि राष्ट्रवादीची मते एकमेकांना ट्रान्स्फर झाली नाहीत. निवडणुकीत आमची व्हेवलेंथ जुळली नाही. एकनाथ शिंदेंना भाजपची 89 टक्के मते ट्रान्स्फर झाली. तर एकनाथ शिंदे गटाची यांची 88 टक्के मते भाजपला ट्रान्स्फर झाली, असं सांगतानाच विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांना सोबत घेऊनच पुढे जाणार असल्याचंही त्यांनी म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.
संघटनात्मक बांधणीचा फायदा नाही
या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना अन्य गोष्टीही निदर्शनास आणून दिल्या. मतांची टक्केवारी कमी राहिल्याने महायुतीला फटका बसला. तसेच लोकसभा निवडणुकीत चुकीच्या नरेटिव्हचाही फटका बसला. भाजपने संघटनात्मक बांधणी केली होती. त्याचा फायदा झाला नाही. मतांची टक्केवारी कमी झाली, असंही फडणवीस यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.