आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

 फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची निवड करण्यात आली आहे.

  • गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 20:47 PM, 18 Nov 2020
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अतुल भातखळकरांची प्रभारीपदी नियुक्ती

मुंबई: येत्या 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून भाजपनं कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आज झालेल्या मुंबई भाजपा कार्यकारिणी बैठकीत अतुल भातखळकर यांच्या नियुक्तीची घोषणा केली. फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल भातखळकर यांची निवड करण्यात आली आहे. (Appointment Of MLA Atul Bhatkhalkar As In Charge For The Upcoming Mumbai Municipal Election)

भाजपाचे तडफदार नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याचा मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन, असा विश्वास भातखळकर यांनी बोलून दाखवला. आगामी महापालिका निवडणुकीत सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढणार असल्याचे भाजपने जाहीर केलेले आहे. अत्यंत चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाला घसघशीत विजय मिळवून देण्याचे आव्हान आमच्यासमोर असेल. त्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली संघटनेला सज्ज करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करू, अशी ग्वाही भातखळकर यांनी दिली. मुंबईकरांना आम्ही भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सत्ताधाऱ्यापासून मुक्ती देऊ आणि पूर्ण बहुमताने भाजपाचा महापौर निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज माझी नियुक्ती जाहीर केली. आमचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर BJPचा महापौर आणू, असा मला विश्वास आहे, असंही ट्विट करत त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार, अशी घोषणा भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकारिणी बैठकीनंतर केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महापालिकेत अडकलेला असल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेचं नाव न घेता लगावला. आगामी निवडणुकीत भाजपचाच विजय होईल. भाजपचा महापालिकेवर झेंडा फडकेल. मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. आम्ही ही भ्रष्टाचारी सत्ता उलथवून लावणार, असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. ठाकरे सरकारचा माज आम्ही उतरवणार आहोत. जनतेच्या पैशांची लूट करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असाही प्रश्न उपस्थित करत फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला.

संबंधित बातम्या

गुपकर आघाडीत काँग्रेसही सहभागी, देशासमोर काँग्रेसला उघडं पाडू : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय मुद्दयावर बोलतोय, देशात कलम 370 लागू होणार नाही म्हणजे नाही : देवेंद्र फडणवीस