भारतीय जनता पार्टीचा ‘तो’ छुपा अजेंडा; शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचा घणाघात

कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कुटीलपणाचे असून, भारतीय जनता पार्टीचा तो छुपा अजेंडा आहे, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे म्हणालेत.

  • हेमंत बिर्जे, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 14:01 PM, 28 Jan 2021
भारतीय जनता पार्टीचा 'तो' छुपा अजेंडा; शिवसेनेच्या मनीषा कायंदेंचा घणाघात
manisha kayande

मुंबईः बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केल्यानं एकच खळबळ उडालीय. त्यावरच आता शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदेंनी हल्लाबोल केलाय. कर्नाटक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कुटीलपणाचे असून, भारतीय जनता पार्टीचा तो छुपा अजेंडा आहे, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनीषा कायंदे म्हणाल्यात. त्या टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. (Bharatiya Janata Party Hidden Agenda; Shiv Sena Manisha Kayande Criticizing On Belgaum Issue)

पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा लोकांसमोरः मनीषा कायंदे

”मुंबईला महाराष्ट्रापासून तोडा हा त्यांचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आलेला आहे. पूर्वीदेखील मुंबईला गुजरातला जोडण्याचे यशस्वी प्रयत्न झाले आणि आता कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा लोकांसमोर आलेला आहे, असंही मनीषा कायंदे म्हणाल्यात.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, मुंबईही आमचाच भाग आहे, अशी मुक्ताफळं उधळली. त्यामुळे आता शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे. मुंबईवर आमचा हक्क आहे, अशी दर्पोक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे. इतकच नाही तर मुंबई प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं वक्तव्यही सवदी यांनी केलं होतं. सवदी यांच्या या वक्तव्यामुळं सीमाभागात संतापाची लाट पसरलीय.

कन्नडिगांचा थयथयाट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वादग्रस्त प्रदेश केंद्रशासित करण्याची मागणी करणार असल्याचं म्हटल्यानंतर कन्नडीगांनी थयथयाट केल्याचं पाहायला मिळालं. कन्नड संघटनांनी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : सघर्ष आणि संकल्प या पुस्तकाच्या प्रतिकात्मक प्रती जाळल्या होत्या. बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिका आणि अन्य संघटनांनी आंदोलन केलं. केंद्र सरकारनं या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी आणावी, अशी मागणीही या संघटनांनी केली होती. तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर लिहिलेल्या ‘संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी ही मागणी केली. कोर्टात एखादं प्रकरण असेल तर त्यानुषंगाने कोणतेही निर्णय घ्यायाचे नसतात. कारण तो कोर्टाचा अवमान समजला जातो. पण कर्नाटक व्याप्त भूभागाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असतानाही कर्नाटक सरकारने बेळगावचं नामांतर केलं होतं. बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आणि विधिमंडळाचं अधिवेसनही घेतलं. कर्नाटकची ही मस्ती जिरवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता हा वादग्रस्त भागच केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. कोर्टात ही मागणी करायला हवी, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. कर्नाटक सरकार बेलगाम वागत आहे. जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित झालाच पाहिजे, असं सांगतानाच कर्नाटक व्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही, असंही त्यांनी ठणकावलं होतं.

संबंधित बातम्या :

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी

सीमावादावर शेवटचं हत्यार कोणतं? शरद पवार म्हणाले…..

Bharatiya Janata Party Hidden Agenda; Shiv Sena Manisha Kayande Criticizing On Belgaum Issue