सातारा : नाना पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होण्यापूर्वी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे प्रदेश अध्यक्ष होते. बाळासाहेब थोरात यांच्या ऐवजी नाना पटोले (Nana Patole) यांना संधी देण्यात आली. तेव्हापासून बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यानंतर वादाची ठिणगी पडली ती नाशिक मतदारसंघातील विधानपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त. काँग्रेसचा तिथं सिटिंग आमदार होता. त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. पण, आमदार तांबे यांना त्यांचा मुलगा सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना उमेदवारी द्यायची होती. एबी फार्म सत्यजित यांच्या वडिलांच्या नावानं आला. त्यामुळं सत्यजित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात भाजपच्या पाठिंब्याने ते विजयीसुद्धा झाले. नंतर बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. यावरून नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या दोन नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.