शरद पवारांबाबत चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले? दादांचं ‘ते’ विधान, ज्यामुळे वादळ उठलंय

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर खरपूस टीका करत सुटले आहेत. (chandrakant patil Criticize)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:07 PM, 23 Nov 2020

मुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्यावर खरपूस टीका करत सुटले आहेत. पुण्यातील एका मेळाव्यात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर टीका केली होती. (Chandrakant Patil Criticize Sharad Pawar On Maratha Reservation Issue)

“राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचं दिसून आलं. त्यांचा अभ्यास नसतो”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र अभ्यासू नेते आहेत, असं पाटील म्हणाले होते. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.

त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यावर सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला होता. “शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मी कायम चांगले बोलत आलो आहे. मी आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मला शरद पवारांबद्दल चुकीचं बोलायचं नव्हतं. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालतं. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालतं का?,” असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट टीकास्त्र सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला होता. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले होते. (Chandrakant Patil Criticize Sharad Pawar On Maratha Reservation Issue)

तसेच शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही चंद्रकांत पाटलांवर टीकास्त्र सोडलं होतं. “महाराष्ट्रातील भाजप नेते पातळी सोडून टीका करत आहेत. शरद पवार हे छोटे नेते आहेत, असं भाजप नेते म्हणाले, मग नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शरद पवारांना पद्मविभूषण पुरस्कार दिला, मोदी सरकारला कळत नाही का?, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचे ताळतंत्र सुटलेय, पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. भाजप नेते भ्रमिष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे लक्ष देऊ नये”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “शरद पवार यांच्यासारख्या नेत्यावर अशा प्रकारची टीका करणे म्हणजे तुमचे मानसिक संतुलन बिघडलं आहे. सत्ता येते जाते. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक यांच्या सारख्या नेत्यांची उंची कोणी काही बोललं म्हणून कमी होत नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

(Chandrakant Patil Criticize Sharad Pawar On Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

भाजपने ठरवलं तर महिला मुख्यमंत्री करायला वेळ लागणार नाही: चंद्रकांत पाटील

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका