मुख्यमंत्री आले आणि बघून गेले, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींचं टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं.

  • भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 16:24 PM, 19 Oct 2020
मुख्यमंत्री आले आणि बघून गेले, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर राजू शेट्टींचं टीकास्त्र

सोलापूरः उद्धव ठाकरे यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी टीका केली. मुख्यमंत्री आले आणि बघून गेले. मुख्यमंत्र्यांनी ज्यांचं सर्वाधिक नुकसान झालं, किमान त्यांना तातडीने सानुग्रह अनुदान जाहीर करायला हवं होतं. शेतकऱ्यांनी माझ्याकडे नाराजी व्यक्त केली असल्याचंही राजू शेट्टींनी सांगितलं आहे. (Raju Shetty’s criticize Uddhav Thackeray’s visit)

नैसर्गिक आपत्तीमुळे तर नुकसान झालेच, पण तांत्रिक चुकादेखील झाल्या आहेत. हे नुकसान टाळता आलं असतं. आठ दिवसांपूर्वी अतिवृष्टीचा इशारा दिला होता, असं राजू शेट्टी म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनंतरही उजनीतून पाणी सोडलं नाही. सोलापूरचा जलसंपदा विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग कोलमडून पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांचाही बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले आहेत.

दुसरीकडे नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या टिप्पणीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं. केंद्र सरकार हे पक्षाचं सरकार आहे. कदाचित ते पक्षाच्यादृष्टीने विचार करत असतील. पण केंद्र सरकार हे देशाचं सरकार आहे. पक्षपात न करता राज्यांची आणि देशाची काळजी घेणं हे केंद्र सरकारचं कर्तव्य आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“शेतकऱ्याच्या डोळ्यात आज पाणी आहे, हे आज आपण सर्व बघत आहोत. त्याने काही बोलावं, काही मागावं, त्यापेक्षा त्याचं दु:ख ओळखून आम्हाला काहीतरी करण्याची गरज आहे, हे फार महत्त्वाचं आहे. ते आम्ही केल्याशिवाय राहणार”, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. “पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फोन केला. त्यामुळे आमची खात्री पटली जर आम्हाला काही गरज लागली तर आम्ही हक्काने त्यांच्याकडे मागू आणि ते नक्की दिल्याशिवाय राहणार नाहीत”, असा विश्वासदेखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

“अंदाज घेऊ, महिती घेऊ, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु”

“घाबरु नका, सावध राहा. त्यामुळे मी म्हणून घोषणा केली नाही. हे करू ते करू, अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु. पंचनामे सुरू आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करु,” असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.हे संकट अजूनही टळलेलं नाही. धोक्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे. येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. संकटाचा काळ संपेपर्यंत घाई करता येत नाही. गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय पंतप्रधानांनीही फोन करून मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पाऊस विचित्र पद्धतीने पडतोय, टार्गेट केल्यासारखा पडतो आहे. दोन तीन दिवस धोका आहे. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला